वाशी: वाशी तालुक्यातील एका गावात २३ वर्षीय तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर दोन वेगवेगळ्या दिवशी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणीने धाडस दाखवत पोलिसांत तक्रार दाखल केली असून, आरोपी तरुणाविरोधात बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी गावातील तिच्या घरी असताना २९ जून २०२५ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गावातीलच एका तरुणाने तिच्या घरी येऊन तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. यानंतर आरोपी थांबला नाही. त्याने २ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पीडितेला दुसऱ्या एका गावात नेऊन पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.याबद्दल कोणाला काही सांगितले तर जीवे ठार मारू, अशी धमकीही आरोपीने पीडितेला दिली होती.
घडलेल्या प्रकारानंतर घाबरलेल्या पीडित तरुणीने अखेर ४ जुलै २०२५ रोजी वाशी पोलीस ठाण्यात धाव घेत स्वतः तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(एम) (बलात्कार), ११५(२), ३५१(२), ३३३ (धमकी व मारहाण) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (ॲट्रॉसिटी) विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे.
(पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्याच्या दृष्टीने तिचे नाव व गावाचा उल्लेख टाळण्यात आला आहे.) या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आरोपीचा शोध घेत असून, पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत.