ढोकी – गावातील सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी असलेल्या समाज मंदिरातच जुगार अड्डा चालवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार ढोकी पोलिसांनी उघडकीस आणला आहे.धाराशिव तालुक्यातील वाखरवाडी येथील समाज मंदिरात सुरू असलेल्या तिरट मटका अड्ड्यावर शनिवारी दुपारी छापा टाकून पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रकमेसह एकूण ३२,१०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ढोकी पोलिसांना वाखरवाडी येथील समाज मंदिरात मोठ्या प्रमाणावर जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी शनिवारी, दि. २६ जुलै रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईत, नानासाहेब भीमराव ढवारे (वय ३८) आणि इतर आठ जण तिरट मटका नावाचा जुगार खेळताना रंगेहाथ सापडले. पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण ३२,१०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः समाज मंदिरात जुगार अड्डा सुरू असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी, ढोकी पोलिसांनी नानासाहेब ढवारे यांच्यासह एकूण नऊ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
उमरगा पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; चौघे ताब्यात, मुद्देमाल जप्त
उमरगा पोलिसांनी तालुक्यातील तलमोड-हिप्परगा रस्त्यावर एका पत्र्याच्या शेडसमोर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे. शनिवारी दुपारी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी तिरट मटका खेळणाऱ्या चौघांना रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
उमरगा पोलिसांना तलमोड येथून हिप्परगा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कमानीजवळच्या एका पत्र्याच्या शेडसमोर काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी, दि. २६ जुलै रोजी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास नियोजनबद्ध सापळा रचून छापा टाकला.
या कारवाईत विष्णु गोरोबा कांबळे (रा. तलमोड), गोपाल मारुती दापेगावे (रा. थोरलवाडी), नेताजी नरसप्पा पाटील (रा. थोरलेवाडी) आणि उमाकांत गुंडप्पा बोकले (रा. कसगी) हे चौघे जण तिरट मटका जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य आणि ३,२०० रुपयांची रोख रक्कम जप्त केली.
याप्रकरणी, उमरगा पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.