स्थळ: गावच्या पारावर, संध्याकाळची वेळ. तिघे मित्र गप्पा मारत बसले आहेत.
पात्रं:
- पक्या: थोडा हुशार आणि राजकारणाची माहिती ठेवणारा.
- भावड्या: सरळ, साधा शेतकरी, ज्याला राजकारणाचं फारसं कळत नाही.
- पेंद्या: थोडा टवाळखोर आणि कोणत्याही विषयावर आपलं मत मांडायला पुढे असणारा.
पक्या: (मोबाईलमध्ये बातमी वाचत) आरं, बघितली का नवी भानगड? आपल्या आमदाराची कीर्ती लयच लांबवर गेली बग.
भावड्या: (तोंडातला तंबाखूचा तोबरा आवरत) का? काय झालं आता नवं? कोणाची जमीन दाबल्याली पावती फाटली का?
पेंद्या: (तोंड वाकडं करत) आरं, जमिनीचा विषय आता किरकोळ झालाय त्यांच्यासाठी. आता डायरेक्ट ड्रग्जवाल्यांशी उठबस हाय यांची.
भावड्या: (डोळे मोठे करत) काय सांगतुय काय? खरं का रं पक्या? मला तर काय कळंनाच.
पक्या: व्हय रं भावड्या. आमदार साहेबांच्या कारभारणीचा, त्या अर्चनाताईंचा वाढदिवस व्हता मुंबईला. अन् तिथं त्यो ड्रग्जमधला मेन आरोपी, पिटू गंगणे, हातात फुलांचा गुच्छ घेऊन म्होरं उभा. फोटो बघा हे… (मोबाईल पुढे करतो).
भावड्या: (फोटो बघून) अवघड हाय सगळं! आरं, ज्याला पोलिसांच्या कोठडीत असावं लागतंय, त्यो तर साहेबांच्या बायकोला शुभेच्छा द्याया गेलाय. मंग कायदा-बियदा हाय का नाय?
पेंद्या: ग्ये मायला! कायदा… भावड्या, तू लयच भोळा रै. आरं, कायदा फक्त आपल्यासारख्या गरिबांसाठी. तिथं तर सगळं संगनमत असतंय. ‘हम साथ साथ हैं’ पिक्चर बघितल्यागत हाय सगळं.
पक्या: पेंद्या बरोबर बोलतोय. एकीकडं बोलायचं, ‘आम्ही कायदा-सुव्यवस्था पाळतो’ अन् दुसरीकडं गुन्हेगारांना मांडीला मांडी लावून बसवायचं. यालाच तर राजकारण म्हणत्यात. लोकांच्या डोळ्यात धूळफेक करायची…
भावड्या: पण त्या ताई तर मागच्या इलेक्शनमध्ये पडल्या व्हत्या ना? दिराच्या विरोधात उभं राहून? तवापासून इकडं फिरकल्या बी नाय म्हणत्यात लोक.
पेंद्या: पडल्या? आरं, नुसत्या पडल्या नाय, सव्वातीन लाख मतांनी आपटल्यात. तवापासून तोंड दाखवायला जागा नाय म्हणून मुंबईला जाऊन बसल्यात. तिथूनच सगळा कारभार चालतोय म्हनं. आता जिल्हा परिषदची निवडणूक जवळ आलीय, की लागल्यात तयारीला. एक तर स्वतः उभ्या राहत्याल, नायतर पोराला, मल्हारला, उभं करत्याल.
पक्या: अन् अजून एक गंमत हाय. तवा त्या राष्ट्रवादीच्या अजितदादांच्या गटाकडून लढल्या. आता नवरा भाजपमध्ये… मंग त्या कुठल्या पक्षात हायत, हे त्यांना बी कळंना झालंय आसंल.
भावड्या: आरं देवा! हे काय राजकारण हाय? नवरा एका घरात, बायको दुसऱ्या घरात. आपलं तर एका घरात चार माणसं असली की भांड्याला भांडं लागतंय. यांचं कसं जमतंय रं?
पेंद्या: (हसतो) भावड्या, तिथं घराचा विषय नसतोय, खुर्चीचा विषय असतोय. आज तुझ्या घरात, उद्या माझ्या घरात… खुर्ची आपलीच पाहिजे. पक्ष कोणताही असो, सत्तेची मलई खायला भेटली पाहिजे, बस्स!
पक्या: खरंय. आता लोक उघड बोलायला लागलीत की, आमदारांचाच वरदहस्त हाय म्हणून असल्या गुन्हेगारांची मस्ती वाढलीय. पोलिसांवर बी दबाव असणारच की कारवाई करायला.
भावड्या: जाऊद्या रं… मला तर यातनं काय कळत नाय. आपलं शेण-मातीचं काम बरं. आपलं भलं नि आपलं रान भलं. असल्या लोकांच्या नादी लागून डोकं खराब करून घ्यायचं फक्त.
पेंद्या: (चुटकी वाजवत) बरोबर! आपलं काय जातंय? वाढदिवस मुंबईच्या हॉटेलमध्ये साजरा करा, नायतर चंद्रावर जाऊन करा. फक्त मतांच्या टायमाला गावात येऊन खोटं खोटं हसायचं विसरू नका म्हणजे झालं. चला, च्या प्या… थंड व्हईल… पुढाऱ्यांच्या नावानं आपण कशाला आपलं तोंड जाळायचं?
– बोरूबहाद्दर