तुळजापूर : तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील लाईटिंग बोर्डवर स्थानिक राजकीय नेत्यांची नावे वापरल्याने वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रपुरुषांच्या नावाचा वापर राजकीय प्रसिद्धीसाठी केला जात असल्याचा आरोप करत, जनहित संघटना महाराष्ट्र राज्यने ही नावे तात्काळ काढून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात संघटनेने ११ ऑगस्ट २०२५ रोजी तुळजापूर नगर परिषदेच्या मुख्यधिकाऱ्यांकडे एक निवेदन सादर केले आहे.
संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर शहरातील राणी लक्ष्मीबाई शॉपिंग सेंटरवर लावण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ या बोर्डवर ‘मार्गदर्शक आ. राणाजगजितसिंह पाटील’ आणि ‘सकंल्पना विशाल भैय्या रोचकरी’ अशी नावे लिहिण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील बोर्डवर ‘सौजन्य विनोद (पिटु भैय्या) गंगणे तुळजापूर’ असे नाव लावण्यात आले आहे.
जनहित संघटनेच्या मते, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपुरुष आहेत. त्यांच्या नावाचा वापर वैयक्तिक आणि राजकीय प्रसिद्धीसाठी करणे हा त्यांचा अवमान आहे आणि यामुळे तमाम शिवप्रेमी आणि भीमप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. ‘सौजन्य’ किंवा ‘मार्गदर्शक’ अशा नावांच्या वापरामुळे संबंधित व्यक्तीनेच तो पुतळा किंवा स्मारक उभारल्याचा आभास निर्माण होतो, असेही निवेदनात नमूद केले आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या:
- चौकांमधील बोर्डवरून ‘मार्गदर्शक’, ‘सकंल्पना’, आणि ‘सौजन्य’ ही राजकीय नेत्यांची नावे तात्काळ हटविण्यात यावीत.
- राष्ट्रपुरुषांचा अपमान करून सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी बोर्ड लावणाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम १५३ ए आणि ५०५ नुसार गुन्हे दाखल करावेत.
संघटनेने इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने यावर कारवाई केली नाही, तर शिवप्रेमी आणि भीमप्रेमी स्वतः ही नावे काढतील. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची असेल, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.
हे निवेदन जनहित संघटनेचे अध्यक्ष अजय (भैय्या) मालुले आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या सहीनिशी मुख्यधिकारी, नगर परिषद तुळजापूर यांना देण्यात आले असून, त्याची एक प्रत माहितीसाठी तुळजापूर पोलीस ठाण्यालाही देण्यात आली आहे.
Video