कळंब: तालुक्यातील मोहा येथील स्मशानभूमीच्या जागेवरून सुरू असलेला वाद आता अधिकच चिघळला आहे. पोलीस पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर आता त्याच घटनेत गावातील ७ जणांवर जीवघेणा हल्ला झाल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी एका ग्रामस्थाने दिलेल्या तक्रारीवरून, २ डझनांहून अधिक नामनिर्देशित आणि इतर ३८ अशा एकूण ६० पेक्षा जास्त जणांच्या जमावावर खुनाच्या प्रयत्नाचा दुसरा गुन्हा कळंब पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
नवनाथ मंचक मडके (वय ४०, रा. मोहा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि. २६ ऑगस्ट) दुपारी साडेबारा वाजता मोहा शिवारातील गट क्रमांक ५२९ मधील स्मशानभूमीच्या जागेच्या कारणावरून हा हल्ला झाला. फिर्यादीनुसार, रमेश काळे, शहाजी काळे, प्रकाश काळे यांच्यासह ६० पेक्षा जास्त जणांच्या जमावाने बेकायदेशीर मंडळी जमवली. त्यांनी नवनाथ मडके यांच्यासह राकेश मडके, पांडुरंग मडके, लक्ष्मण मडके, भिमराव मडके, अंगद मडके आणि श्रीराम मडके यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने जबर मारहाण केली. यात हे सर्वजण गंभीर जखमी झाले असून, आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
विशेष म्हणजे, ज्यावेळी हा हल्ला झाला, त्याचवेळी जागेची हद्द निश्चिती करण्यासाठी आलेल्या महसूल आणि पोलीस पथकावरही याच जमावाने दगडफेक केली होती. त्याप्रकरणी पोलिसांनी एक स्वतंत्र गुन्हा आधीच दाखल केला आहे. आता ग्रामस्थांच्या तक्रारीवरून हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
नवनाथ मडके यांच्या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी जमावावर भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम १०९, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२),(३), १८९(२), १९१(२), १९० अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.