धाराशिव जिल्ह्यात बेंबळी आणि येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून, अज्ञात चोरट्यांनी एका ठिकाणाहून शेतीचे साहित्य तर दुसऱ्या ठिकाणाहून वाहनाचे पार्ट चोरून नेले आहेत. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, तपास सुरू आहे.
बेंबळी: शेडचे कुलूप तोडून गुऱ्हाळाच्या कडईसह कॉपर वायरची चोरी
बेंबळी – बेंबळी येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने गुऱ्हाळाच्या दोन मोठ्या कढई आणि कॉपर वायर असा एकूण २०,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना २० ते २१ ऑगस्ट दरम्यान घडली असून, याप्रकरणी ८ सप्टेंबर रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सागर अनिल गिरवलकर (वय ४०, रा. बेंबळी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. गिरवलकर यांचे बेंबळी शिवारातील गट क्रमांक ५४ मध्ये शेत आहे. २० ऑगस्टच्या रात्री ८ ते २१ ऑगस्टच्या सकाळी ८ वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडले. त्यानंतर आतील गुऱ्हाळाच्या दोन कढई आणि ७० फूट लांबीची कॉपर वायर असा एकूण २०,००० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या घटनेनंतर सागर गिरवलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, बेंबळी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (४) आणि ३०५ (ए) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
येरमाळा: पिकअपची ताडपत्री फाडून ३६ हजारांचे रॉयल एनफिल्डचे पार्ट चोरले
येरमाळा – येरमाळा ते चोराखळी दरम्यान रस्त्यावर एका पिकअप वाहनाची ताडपत्री फाडून अज्ञात चोरट्याने त्यातील तब्बल ३६,००० रुपये किमतीचे रॉयल एनफिल्ड कंपनीचे पार्ट चोरून नेले आहेत. ही घटना ७ सप्टेंबर रोजी रात्री घडली असून, येरमाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण अर्जुन पाटील (वय २४, रा. रोहीलागड, ता. अंबड, जि. जालना) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी पाटील हे आपल्या पिकअप (क्र. एमएच २० जीझेड २९४६) मधून रॉयल एनफिल्ड कंपनीचे पार्ट घेऊन जात होते. ७ सप्टेंबर रोजी रात्री १० ते १०:३० वाजण्याच्या सुमारास, येरमाळा ब्रिज ते चोराखळी येथील एच. पी. पेट्रोल पंपादरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पिकअप वाहनावरील ताडपत्री फाडली.
चोरट्याने गाडीतील तीन कॅरेटमध्ये असलेले रॉयल एनफिल्ड कंपनीचे ३० पार्ट (एकूण किंमत ३६,००० रुपये) चोरून नेले. फिर्यादी किरण पाटील यांच्या तक्रारीवरून येरमाळा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (ब) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.