धाराशिव: माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभर वादग्रस्त ठरलेल्या आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे चर्चेत आलेल्या पिंपळगाव (क) येथील तुळजाई सांस्कृतिक लोककला नाट्य केंद्राच्या पापाचा घडा अखेर भरला आहे. ‘धाराशिव लाइव्ह’ सह इतर माध्यमांनी सातत्याने आवाज उठवल्यानंतर आणि पोलिसांच्या ठोस अहवालानंतर, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा अंतिम आदेश दिला आहे. या निर्णयामुळे कायद्याचे राज्य अबाधित राखले गेले असून, संस्कृतीच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध धंद्यांना मोठा चाप बसला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नेमकं काय?
जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या अंतिम आदेशात या प्रकरणावर निर्णायक पडदा टाकला आहे. आदेशातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे:
- केंद्राच्या मालकीन, श्रीमती विजया हिरामण अंधारे, यांनी तहसीलदारांच्या आदेशाविरुद्ध केलेला पुनर्विचार अर्ज फेटाळण्यात आला आहे.
- या कार्यालयाने २०२२ मध्ये केंद्राच्या उभारणीसाठी दिलेले मूळ ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ (NOC) कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहे.
- वाशीच्या तहसीलदारांनी १७ जून २०२५ रोजी निलंबित केलेले तीनही परवाने (जागेची अनुज्ञप्ती, कार्यक्रमाची अनुज्ञप्ती आणि तिकीट विक्रीची अनुज्ञप्ती) आता कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.
प्रशासकीय दिरंगाई ते अंतिम कारवाई
गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर या केंद्रातील गैरप्रकार चव्हाट्यावर आले होते, वाशी पोलिसांनी केलेल्या तपासणीत अनेक गंभीर बाबी समोर आल्यानंतर 5तहसीलदारांनी केंद्राचा परवाना निलंबित केला होता. मात्र, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी या कारवाईला स्थगिती दिल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संशय व्यक्त होत होता. यानंतर ‘धाराशिव लाइव्ह’ सह इतर माध्यमांनी हे प्रकरण लावून धरले आणि पोलिसांनी केंद्राच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा सविस्तर अहवाल थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. या अहवालानंतर आणि वाढत्या सामाजिक दबावानंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी ही अंतिम आणि निर्णायक कारवाई केली आहे. या निर्णयाने तुळजाई कला केंद्राच्या अवैध कारभारावर अखेरचा खिळा ठोकला गेला आहे.