धाराशिव – महाराष्ट्र राज्यात गुटखाबंदीचा कायदा लागू असूनही, जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या धाराशिव शहरात या कायद्याची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील अनेक प्रमुख भागांमध्ये प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री सुरू असून, पोलीस प्रशासन याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांमधून होत आहे.
शहरातील आगड गल्ली, सांजा रोड, खाजा नगर, विजय चौक, वैराग नाका, ज्ञानेश्वर मंदिर परिसर, गालिब नगर, बस स्टँड परिसर, नगरपरिषद कॉम्प्लेक्स, आणि समर्थ नगर यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी गुटख्याची विक्री राजरोसपणे सुरू आहे. या भागांमध्ये छोटे-मोठे विक्रेते कोणाचीही भीती न बाळगता हा अवैध व्यवसाय चालवत आहेत. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार धाराशिव शहर आणि आनंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतच घडत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांच्या ‘आशीर्वादानेच’ हा व्यवसाय फोफावत आहे. पोलीस यंत्रणेकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने गुटखा माफियांना एक प्रकारे अभय मिळाल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणीच कायद्याची अशी पायमल्ली होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
तरुण पिढीला व्यसनाधीन बनवणारा हा अवैध धंदा तात्काळ बंद करावा आणि यामागे असणाऱ्यांवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.