धाराशिव: “आम्ही पोलीस आहोत, चौकशी करायची आहे,”… “तुमचं आयकार्ड दाखवा,”… “पुढे धोका आहे, सोनं आमच्याकडे द्या”… थांबा! जर तुम्हालाही रस्त्यात कोणी असं अडवलं, तर आधी शंभर वेळा खात्री करा. कारण धाराशिव जिल्ह्यात सध्या ‘खऱ्या’ पोलिसांपेक्षा ‘डुप्लिकेट’ पोलिसांचीच दहशत वाढली आहे. कायदा-सुव्यवस्थेचा धाक दाखवण्याऐवजी, चक्क पोलिसांच्या नावानेच लुटमार होत आहे.
एकाच आठवड्यात धाराशिव शहर, उमरगा आणि ढोकी अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी, जवळपास सारख्याच पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांना लुटल्याच्या घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या ‘नटवरलालांनी’ खाकी वर्दीचा असा ‘डुप्लिकेट’ खेळ मांडलाय की, खरे पोलीसही चक्रावले आहेत.
‘ऑपरेशन लुटमार’ : आठवडाभरात तीन शिकार
या टोळीचा पहिला फटका बसला धाराशिव शहरात. १६ ऑक्टोबर रोजी प्रभुलिंग राजुरे (वय ६२) यांना एस.टी. गॅरेजसमोर दोघांनी मोटारसायकलवरून येऊन अडवले. ‘आम्ही पोलीस आहोत, चौकशी करायची आहे’ म्हणत, त्यांच्याशी बोलण्याच्या नादात हातचलाखीने ४० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढून घेतली आणि ‘खिशात ठेवली’ असे सांगून पसार झाले.
हा प्रकार ताजा असतानाच, १९ ऑक्टोबरला उमरग्यात शशिकांत चनपटने (वय ६६) हे या ‘डुप्लिकेट’ पोलिसांच्या जाळ्यात अडकले. “आम्ही पोलीस आहोत, पुढे धोका आहे, तुमचे दागिने आमच्याकडे द्या, आम्ही गुल्यानंतर परत देऊ,” अशी थाप मारून या भामट्यांनी त्यांच्याकडून चक्क ४ लाख ४३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कडे आणि अंगठी घेतली आणि बुलेटवरून धूम ठोकली.
ही टोळी इतक्यावरच थांबली नाही. २१ ऑक्टोबर रोजी, म्हणजे कालच, ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रमोद बिडकर (वय ७६) यांना रेल्वे स्टेशनजवळ अडवले. यावेळी या ठगांनी चक्क ‘पोलीस आयकार्ड’ दाखवून त्यांची दिशाभूल केली आणि त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चेन व सात ग्रॅमची अंगठी घेऊन पोबारा केला.
ज्येष्ठ नागरिक ‘सॉफ्ट टार्गेट’
या तिन्ही गुन्ह्यांमध्ये एक गोष्ट समान आहे – लुटारूंचे ‘टार्गेट’ हे ज्येष्ठ नागरिक (वय ६२, ६६, ७६) आहेत. त्यांना कायद्याचा धाक दाखवून किंवा बोलण्यात गुंतवून सहज फसवले जात आहे. विशेष म्हणजे, हे सर्व प्रकार दिवसाढवळ्या घडत आहेत.
एकाच आठवड्यात तीन-तीन गुन्हे घडल्याने नागरिकांमध्ये, विशेषतः वयोवृद्ध लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिवसाढवळ्या, पोलिसांच्याच नावाने होणारी ही लूटमार, खऱ्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. आता हे ‘डुप्लिकेट’ पोलीस नेमके कोण आहेत आणि ‘खरे’ पोलीस या ‘खाकी’ लुटारूंना कधी गजाआड करणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.