तुळजापूर : संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी (Tuljapur Drug Case) एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऐन नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर, याच ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर सुटलेल्या दोन माजी नगराध्यक्षांना भारतीय जनता पक्षात (BJP) शानदार प्रवेश देण्यात आला आहे. खुद्द स्थानिक आमदार राणा पाटील (MLA Rana Patil) यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडल्याने, भाजपवर (BJP) टीकेची झोड उठत असून, आमदारांकडून ‘ड्रग्ज माफियांचे उदात्तीकरण’ केले जात असल्याचा संतप्त आरोप जनतेतून होत आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी, माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर-कदम आणि चंद्रकांत उर्फ बापू कणे यांना एका शानदार सोहळ्यात भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. आमदार राणा पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे ड्रग्जसारख्या गंभीर विषयावरून तुळजापूर बदनाम होत असताना, त्याच प्रकरणातील आरोपींना पक्षात घेऊन भाजप नेमका काय संदेश देऊ इच्छिते? असा सवाल विचारला जात आहे.
सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र; ‘राजाश्रय’ मिळत असल्याचा आरोप
या संपूर्ण प्रकारावर खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहिले आहे.
सुळे यांनी पत्रात म्हटले आहे की, “तुळजापूर शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींचा भाजपमध्ये समावेश झाल्याची बातमी वाचून सखेद आश्चर्य वाटले. विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले. यातून ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता देखील वाटली.”
त्या पुढे म्हणाल्या, “आपण राज्याचे प्रमुख आहात, कदाचित ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नसावी, किंवा सदर व्यक्तीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत आपल्याला माहिती देण्यात आली नसावी, हे गृहित धरुन मी आपणास हे पत्र लिहित आहे.”
“ड्रग्जविरोधी लढ्यात आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत. तुळजापूरमधील या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कराल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. ड्रग्स तस्करीला या महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही, अशा प्रकारचा सकारात्मक संदेश समाजात जाण्यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे,” अशी मागणी सुळे यांनी केली आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना पक्षात घेतल्याने आमदार राणा पाटील आणि भाजप पक्ष चांगलाच अडचणीत आला आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पत्राची काय दखल घेतात आणि संबंधितांवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.






