धाराशिव – शहरातील सुनील प्लाझा कॉम्प्लेक्समधील ज्योती क्रांती को- ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीवर भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकून ४ किलो सोने लुटणाऱ्या पाच पैकी तीन दरोडेखोरांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या दरोड्यातील मुख्य आरोपी रमेश बळीराम दीक्षित हा ज्योती क्रांती बँकेत तीन वर्षापूर्वी कामास होता, नोकरीवरून निघाल्यानंतर त्याने झटपट श्रीमंत होण्यासाठी बँकेवर दरोडा टाकला पण त्याचा हा खेळ अंगलट आला आहे,.
दि.23.12.2023 रोजी 17.38 वा. सु. ज्योती क्रांती को- ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी शाखा धाराशिव मध्ये पाच अनोळखी इसमांनी येवून रिव्हालवर व चाकुचा धाक दाखवून ज्योती क्रांती कोऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी मधील रोख रक्कम 1,40,000₹, दोन मोबाईल, 6,000 ₹ व 4 किलो 126 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत 1, 85, 68, 000 ₹ असा एकुण 1, 87, 14, 000 ₹ किंमतीचा माल जबरीने लुटून पसार झाले. अशी फिर्याद नामे- सतीश अनिरुध्द फुटाणे, वय 37 वर्षे, व्यवसाय- कॅशीअर ज्योती क्रांती कोऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी शाखा धाराशिव, रा. पळसप ता. जि. धाराशिव यांनी दि.24.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 395 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांच्या निष्क्रिय कारभारामुळे भरदिवसा पडलेल्या दरोड्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. अखेर पोलिसांनी आपली गेलेली अब्रू वाचवत या दरोड्याप्रकरणी तीन आरोपीना अटक केली आहे. त्यात शहरातील विजय चौकमध्ये राहणाऱ्या रमेश बळीराम दीक्षित याचा समावेश असून, तो पवनचक्की वाहनावर चालक आहे. त्यानेच हा संपूर्ण दरोड्याचा कट रचल्याचे समोर आले आहे. अन्य दोन दरोडेखोरात प्रशांत जालिंदर शिंदे ( रा. नेरुळ, मुंबई ) आणि उदयन बेलाउदयन वल्लिकालाईल ( रा. नेरुळ , मुंबई ) यांचा समावेश आहे. मुख्य आरोपी दीक्षित याच्याकडून १ किलो सोने हस्तगत करण्यात आले आहे,. सर्व आरोपीना ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
बँकेचा कर्मचारीच निघाला दरोडेखोर
दरोड्यातील मुख्य आरोपी रमेश बळीराम दीक्षित हा ज्योती क्रांती को- ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीमध्ये तीन वर्षापूर्वी काम करत होता. त्यास बॅंकेची खडा न खडा माहिती आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने त्यानेच आंतरराज्य गुन्हेगारांशी संधान साधून दरोड्याचा प्लॅन केला होता. या दरोड्यात आणखी काही कर्मचारी गुंतल्याची शक्यता आहे.
सुरक्षा रक्षक का नाही ?
बँकेत चार किलो सोने होते तर सुरक्षा रक्षक का ठेवला नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हे सोने नेमके कुणाचे होते ? शहरातील एकानेही अजून माझे सोने बँकेत होते, अशी तक्रार केलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चोरावर मोर होण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत.
दीड कोटी नेमके गेले कुणीकडे ?
चोऱ्या, दरोडे आणि गुन्हेगारीचा तपास करण्यासाठी मदत व्हावी म्हणून शहरातील मुख्य चौकात सीसीटीव्ही बसवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून पोलीस विभागाला सहा वर्षांपूर्वी दीड कोटी निधी देण्यात आला आहे. पण एकाही चौकात अद्याप सीसीटीव्ही पोलीस विभागाने बसवले नाहीत, नेमका हा निधी गेला कुणीकडे हा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.