धाराशिव: “आम्ही ‘धाराशिव २.०’ या फेक पेजवर कारवाईची मागणी करत आहोत, मग त्या ॲडमिनला वाचवायला भाजपचे लोक का पुढे येत आहेत? आणि राहिला प्रश्न टीआरपीचा, तर टीआरपी वाढवायला ते काय ओमराजे आहेत का? ज्यांचे नाव आम्हाला घ्यावे लागेल,” अशा शब्दांत युवासेना जिल्हाप्रमुख रवींद्र वाघमारे यांनी भाजपला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
फेक एक्झिट पोल प्रकरणी ठाकरे गटाने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर भाजप जिल्हा प्रवक्ते ॲड. नितीन भोसले यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यावर टीका केली होती. तसेच, “टीआरपीसाठी विरोधक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव घेतात,” असा आरोप केला होता. या आरोपांचा रवींद्र वाघमारे यांनी खरपूस समाचार घेतला.
नेमकं काय म्हणाले रवींद्र वाघमारे?
“आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन थेट प्रश्न विचारला की, आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. मात्र, हे प्रकरण समोर येताच भाजपचा ‘छुपा पुढाकार’ आणि बचाव करण्याचे प्रयत्न सिद्ध झाले आहेत. मुळात ‘धाराशिव २.०’ आणि तुमचा काय संबंध आहे? आम्ही त्या पेजवर बोललो तर तुम्हाला मिरच्या का झोंबल्या?” असा थेट सवाल वाघमारे यांनी केला आहे.
“आमच्याकडे ‘ओमराजे’ ब्रँड असताना दुसऱ्यांची गरज काय?”
भाजपच्या टीआरपीच्या आरोपावर बोलताना वाघमारे यांनी भाजपला चिमटा काढला. ते म्हणाले, “तुम्ही म्हणता की टीआरपीसाठी आम्ही राणा पाटलांचे नाव घेतो. पण ते काय ओमराजे निंबाळकर आहेत का? आमच्याकडे ओमराजेंसारखे वलयांकित नाव असताना आम्हाला प्रसिद्धीसाठी दुसऱ्यांचे नाव घेण्याची गरजच काय? मुळात ज्यांनी चुकीचा आणि फेक व्हिडिओ प्रदर्शित केला, त्यांना जाऊन विचारा की तुमच्यावर ही वेळ का आली?”
“रडका डाव खेळून काय सिद्ध केलं?”
भाजपवर हल्लाबोल करताना वाघमारे पुढे म्हणाले की, “तुमच्यात पहिल्यापासून समोरासमोर लढण्याची धमक नव्हती. म्हणूनच असले फेक व्हिडिओ तयार करून रडका डाव खेळावा लागला. यातून तुम्ही काय साध्य केले, याचे उत्तर आधी भाजपने द्यावे,” असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
‘धाराशिव २.०’ च्या फेक एक्झिट पोल प्रकरणानंतर आता भाजप आणि ठाकरे गटातील शाब्दिक युद्ध चांगलेच पेटल्याचे दिसून येत आहे.






