तुळजापूरच्या मातीला कलंक लावणाऱ्या आणि युवा पिढीला नशेच्या खाईत लोटणाऱ्या ड्रग्ज प्रकरणाने सध्या हिवाळी अधिवेशनापासून ते गल्लीबोळापर्यंत चर्चा सुरू आहे. अशातच या प्रकरणातील संशयित आरोपी आणि स्वतःला ‘प्रतिष्ठित’ समजणाऱ्या विनोद उर्फ पिंटू गंगणे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि ‘धाराशिव लाइव्ह’चे संपादक म्हणून मला (सुनील ढेपे) १० कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली. या ‘मुजोर’ नोटीसीला आम्ही आमचे वकील ॲड. विशाल साखरे यांच्या मार्फत जे ‘कायदेशीर’ आणि ‘सडेतोड’ उत्तर दिले आहे, ते म्हणजे या प्रवृत्तींच्या थोबाडीत मारलेली चपराकच आहे!
मुळात, ज्यांच्यावर एन.डी.पी.एस. (NDPS) सारख्या गंभीर कलमाखाली गुन्हे दाखल आहेत, ज्यांना समाजाने बहिष्कृत करायला हवे, ते आज १० कोटींच्या इज्जतीचा दावा करत आहेत. हा प्रकार म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ नाही तर काय? गंगणे महाशयांचा युक्तिवाद तर पहा – म्हणतात, “मी ड्रग्जचा केवळ ग्राहक आहे, पेडलर नाही.” अरे वा! अमली पदार्थांचे सेवन करणे हा काय पराक्रम आहे का? ग्राहक असणे हे काय तुमच्या चारित्र्याचे प्रमाणपत्र आहे? स्वतःच्या पापाची कबुली देऊन पुन्हा १० कोटी मागणारे हे महाभाग कोणत्या जगात वावरत आहेत?
जामीन मिळाला म्हणजे निर्दोष सुटलात, या भ्रमात राहू नका. कायद्याच्या आणि समाजाच्या नजरेत ड्रग्जशी संबंधित प्रत्येक व्यक्ती ही गुन्हेगारच असते.
गेली ३५ वर्षे मी पत्रकारितेत आहे. ‘धाराशिव लाइव्ह’च्या माध्यमातून गेल्या १४ वर्षांपासून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम अविरत सुरू आहे. ऊठसूट कोणाच्याही धमक्यांना किंवा नोटीसांना घाबरून घरात बसणारी आमची पत्रकारिता नाही. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे प्रतिनिधी म्हणून, एका जबाबदार खासदाराने जाहीर सभेत मांडलेली भूमिका जशीच्या तशी जनतेसमोर मांडणे, हे आमचे कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडले. त्याला जर तुम्ही ‘बदनामी’ म्हणत असाल, तर अशी बदनामी (सत्य) आम्ही रोज करू! व्हिडिओ हटवण्याचा किंवा माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट, खोट्या नोटीसा पाठवून आम्हाला मानसिक त्रास दिल्याबद्दल आम्हीच आता तुमच्यावर प्रति-दावा (Counterclaim) ठोकणार आहोत.
हे प्रकरण केवळ एका नोटीसीपुरते मर्यादित नाही. तुळजापूरचे ड्रग्ज रॅकेट उघड केल्यापासून, स्थानिक पोलीस आणि प्रशासनातील काही घटकांचा तिळपापड झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मला सातत्याने त्रास दिला जात आहे. तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) निलेश देशमुख हे तर ठरवून मागे लागले आहेत. नोटिसांवर नोटिसा पाठवणे, खोटे गुन्हे दाखल करणे, हे प्रकार कशासाठी? केवळ सत्य लपवण्यासाठी? पण लक्षात ठेवा, मी सुनील ढेपे आहे. ३५ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक वादळे अंगावर घेतली आहेत, पण लेखणी कधी झुकली नाही आणि झुकणारही नाही.
तुळजापूर पोलीस ठाण्यात माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, पण या दडपशाहीला ‘धाराशिव लाइव्ह’ भीक घालत नाही. विनोद गंगणे असो किंवा त्यांना पाठीशी घालणारी यंत्रणा, त्यांनी हे लक्षात ठेवावे की, तुम्ही १० कोटी मागितले काय, किंवा १००० कोटी… सत्याचा लिलाव होत नसतो!
जर गंगणे यांनी न्यायालयात जाण्याचे धाडस केले, तर आम्हीही पुराव्यानिशी सज्ज आहोत. ही लढाई आता केवळ एका नोटीसीची नाही, तर धाराशिवला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्याची आहे. आणि या लढाईत ‘धाराशिव लाइव्ह’ शेवटपर्यंत माघार घेणार नाही.
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह
(जेथे सत्य, तेथे आम्ही!)






