तामलवाडी: सोलापूरकडून तुळजापूरकडे जाणाऱ्या एका इनोव्हा कारमधून गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, पोलिसांनी थरारक पाठलाग करून गाडी पकडली असता, त्यात गोमांस नसून शासनाने बंदी घातलेला सुगंधी तंबाखू आणि विमल गुटखा आढळून आला. ही धडाकेबाज कारवाई तामलवाडी पोलिसांनी सोमवारी (दि. २९) पहाटे १ वाजेच्या सुमारास मॉडर्न हायस्कूल समोर केली. या कारवाईत पोलिसांनी कारसह एकूण ९ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांना २९ डिसेंबर २०२५ रोजी गुप्त माहिती मिळाली होती की, सोलापूरकडून तुळजापूरकडे जाणाऱ्या इनोव्हा कारमधून (क्र. एम एच १३, ए एक्स १७३८) गोमांसाची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे तामलवाडी पोलिसांच्या पथकाने सापळा रचला आणि सदर कारचा पाठलाग करून मॉडर्न हायस्कूल समोर गाडी अडवली.
पोलिसांनी कारमधील दोन इसमांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे इब्राहीम सलीम शेख (रा. बेगम पेठ, सोलापूर) आणि सोहेल अहेमद कुरेशी (रा. सिद्धेश्वर पेठ, सोलापूर) अशी सांगितली. पोलिसांनी कारची झडती घेतली असता, त्यांना आत गोमांस ऐवजी सुगंधी सुपारी, विमल आणि तंबाखूची पोती आढळून आली.
या कारवाईत पोलिसांनी विमल आणि तंबाखूची २० पोती असा एकूण ५ लाख ९६ हजार रुपयांचा गुटखा आणि गुन्ह्यात वापरलेली कार, असा एकूण ९ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोकुळ ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप टेकाळे, तसेच पोलीस अंमलदार उमेश माने, तुराब शेख, सुरज नरवडे, दिनकर तोगे, जुबेर काझी आणि मिथुन गायकवाड यांच्या पथकाने केली.






