धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रुईभर येथे पार पडलेल्या जाहीर सभेत शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजपचे आमदार राणा पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्ते रामदास कोळगे यांना उमेदवारी नाकारल्याच्या मुद्द्यावरून निंबाळकरांनी राणा पाटलांना लक्ष केले.
“निष्ठावंतांवर अन्याय का?”
रुईभर येथील सभेत बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आमदार राणा पाटील यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “जेव्हा राणा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, तेव्हा रुईभरचे रामदास कोळगे भाजपचे काम नेटाने करत होते. त्या काळात कोळगे यांनी पक्षासाठी लाठ्या-काठ्या खाल्ल्या. मात्र, आज जेव्हा भाजपची सत्ता आहे आणि राणा पाटील पक्षात आले आहेत, तेव्हा याच निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून बाहेरचा उमेदवार लादण्यात आला आहे.”
रामदास कोळगे कोण आहेत?
यावेळी निंबाळकरांनी रामदास कोळगे यांच्या ४० वर्षांच्या तपश्चर्येचा उल्लेख केला.
-
रामदास कोळगे हे गेल्या ४० वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहेत.
-
त्यांनी भाजपचे माजी सरचिटणीस आणि भाजयुमोचे माजी जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
-
रुईभर परिसरात त्यांची शाळा असून अनेक संस्था त्यांच्या ताब्यात आहेत.
बंडखोरीची शक्यता ते माघार
बेंबळी गटातून रामदास कोळगे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारून आयता उमेदवार दिल्याने ते नाराज होते. कोळगे बंडखोरी करून निवडणूक लढवतील अशी दाट शक्यता निर्माण झाली होती, परंतु शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. याच धाग्याला पकडून ओमराजे निंबाळकर यांनी भर सभेत भाजपच्या अंतर्गत राजकारणावर आणि निष्ठावंतांच्या होणाऱ्या अवहेलनेवर बोट ठेवले.







