धाराशिव- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर धाराशिवच्या राजकीय वर्तुळात सत्तास्थापनेवरून अनेक चर्चांना उधाण आले आहे. या सर्व चर्चांना पूर्णविराम देत जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाम भूमिका मांडली आहे. “सत्ता महत्त्वाची असली तरी पक्षाची एकजूट त्याहून अधिक महत्त्वाची आहे. प्रसंगी आम्ही विरोधी बाकांवर बसू, मात्र शिवसेनेत कोणतीही फूट पडू देणार नाही,” असा सज्जड इशारा सरनाईक यांनी दिला आहे.
अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर टीका
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्र लढवल्या होत्या. सध्या एकत्रित सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरू असताना, काही मंडळींकडून माध्यमांमध्ये जाणीवपूर्वक दिशाभूल करणाऱ्या बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप पालकमंत्र्यांनी केला आहे. स्वार्थी राजकारणातून शिवसेनेतील एक गट फुटल्याचा खोटा प्रचार केला जात असून, असा खोडसाळपणा कदापि सहन केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार तानाजी सावंत आणि पक्षाची एकजूट
आमदार तानाजी सावंत यांना वेगळे ठेवून शिवसेनेत मतभेद असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न काही जण करत असल्याचे नमूद करत सरनाईक म्हणाले, “आमचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना अखंड, अभेद्य आणि सशक्त आहे. कोणत्याही दबावाला किंवा अफवांना आम्ही बळी पडणार नाही.”
वरिष्ठ नेत्यांशी चर्चेनंतरच पुढील रणनीती
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माहिती देताना सरनाईक यांनी सांगितले की, “मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षा श्रीमती सुनिताताई पवार यांच्याशी चर्चा करूनच जिल्ह्याची पुढील राजकीय रणनीती ठरवणार आहे.” तसेच, पक्षाच्या पुढील रणनीतीबाबत कोणत्याही तथाकथित ‘बोलघेवड्या स्वयंभू’ नेत्यांनी भाष्य करू नये, अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली.
शिवसैनिकांना आवाहन
“सत्ता हे ध्येय असले तरी तत्त्वांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. दबाव, आमिष किंवा अफवांच्या आधारे शिवसेनेची एकजूट ढळणार नाही,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, जिल्ह्यातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे आणि पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल, त्या निर्णयाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पक्षसंघटन बळकट करावे, असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.







