वाशी: वाशी तालुक्यातील घाटपिंपरी ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून तब्बल ४० लाख ५५ हजार ८३ रुपयांचा अपहार झाल्याचा मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या प्रकरणी घाटपिंपरीच्या सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि एका ठेकेदाराविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमका प्रकार काय?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे २०२४ ते ४ नोव्हेंबर २०२५ या दीड वर्षांच्या कालावधीत हा गैरप्रकार घडला आहे. घाटपिंपरी ग्रामपंचायतीला १५ व्या वित्त आयोगांतर्गत विकासकामांसाठी निधी प्राप्त झाला होता. यापैकी ४०,५५,०८३ रुपयांच्या निधीचा आरोपींनी संगनमत करून स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. शासकीय निधीचा गैरवापर झाल्याचे लक्षात आल्यानंतर पंचायत समिती स्तरावरून कारवाईची पावले उचलण्यात आली.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल:
याप्रकरणी संगनमत करून अपहार केल्याचा ठपका ठेवत खालील तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत:
-
अश्विनी विनोद सातपुते (सरपंच, ग्रामपंचायत घाटपिंपरी, ता. वाशी)
-
अनिल राजाराम तुपेरे (ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत घाटपिंपरी, ता. वाशी)
-
मनोज पवार (प्रोप्रायटर, रेवा एन्टरप्रायझेस, धाराशिव ४१३५०१)
विस्तार अधिकाऱ्यांची फिर्याद:
शासकीय निधीवर डल्ला मारल्याचे उघडकीस आल्यानंतर, वाशी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विलास श्रीधरराव माचवे (वय ५३) यांनी शनिवारी (दि. २८ मार्च २०२६) वाशी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. त्यांच्या या प्रथम खबरेवरून वाशी पोलिसांनी वरील तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२), ३१६(५), आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत. सरपंचासह ग्रामपंचायत अधिकाऱ्यावरच गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात या कारवाईची चर्चा सुरू आहे.







