धाराशिव : पत्नीशी फोनवर का बोलतोस, असे समजावून सांगण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला आणि भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या मुलाला लाकडी काठीने गंभीर मारहाण केल्याची घटना तालुक्यातील आळणी येथे घडली. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन शिवाजी निंबाळकर (वय ४५, रा. आळणी, ता. जि. धाराशिव) यांच्या पत्नीशी गावातीलच धनंजय अनंत कोरे हा वारंवार फोनवर बोलत होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सचिन निंबाळकर हे बुधवारी (ता. २२) रात्री नऊ वाजेच्या सुमारास धनंजय कोरे याला समजावून सांगण्यासाठी व जाब विचारण्यासाठी गेले होते. याचा राग आल्याने आरोपी धनंजय याने सचिन यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच लाथाबुक्क्यांनी व लाकडी काठीने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले.
यावेळी वडिलांना वाचवण्यासाठी आणि भांडण सोडवण्यासाठी सचिन यांचा मुलगा मध्ये पडला असता, आरोपीने त्याच्याही डोक्यात काठी मारून त्याला जखमी केले व दोघांनाही जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर सचिन निंबाळकर यांनी शुक्रवारी (ता. २४) दिलेल्या प्रथम खबरीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी धनंजय कोरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११७(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) व (३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.






