कळंब: तालुक्यातील मलकापूर येथील श्री दत्त मंदिर मठाशेजारील तलावात बुडून एका १५ वर्षीय अल्पवयीन वारकरी मुलाचा मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेत आणखी एक जण बेशुद्ध असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
नेमकी घटना कशी घडली?
मठाचे महाराज एकनाथ लोमटे यांच्या वडिलांची आज पुण्यतिथी होती. या निमित्ताने मठात अभंग आणि कीर्तनाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात साथसंगत करण्यासाठी आणि पखवाज वाजवण्यासाठी अंबाजोगाई आणि तेर येथील वारकरी संस्थेतील येथून काही तरुण मुलांना बोलावण्यात आले होते.
कार्यक्रमादरम्यान यातील पाच मुले मठाशेजारी असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेली होती. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील एका १५ वर्षीय वारकरी रुद धुमाळ , तेर याचा पाण्यात बुडून करुण अंत झाला. तर त्याच्यासोबत असलेला आणखी एक जण बेशुद्ध अवस्थेत सापडला आहे.
महाराजांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह:
ज्या मठात आणि ज्या महाराजांच्या कार्यक्रमात ही घटना घडली, ते मठाचे महाराज एकनाथ लोमटे यांच्यावर यापूर्वीच अनेक गंभीर आरोप आहेत. त्यामुळे या घटनेनंतर परिसरात अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. कीर्तनासाठी आलेल्या लहान मुलांच्या सुरक्षेकडे मठाने दुर्लक्ष केले का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास आता पोलीस करत आहेत.
ठळक मुद्दे:
-
मलकापूर येथील श्री दत्त मंदिर मठाशेजारील तलावात घडली दुर्घटना.
-
पाच जण तलावात पोहायला गेले होते; एकाचा मृत्यू तर एक जण बेशुद्ध.
-
अंबाजोगाई आणि तेर येथून कीर्तनात पखवाज वाजवण्यासाठी आली होती तरुण मुले.
-
मठाचे वादग्रस्त महाराज एकनाथ लोमटे यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीचा होता कार्यक्रम.





