येरमाळा: शेतातून पाण्याचा टँकर नेण्यास विरोध केल्याच्या रागातून एकाने दादागिरी करत चक्क टँकरच्या १०० फेऱ्या मारून शेतात गुडघ्याइतकी चारी पाडल्याचा धक्कादायक प्रकार कळंब तालुक्यातील मलकापूर येथे घडला आहे. या मग्रुरीच्या कृत्यात शेतकऱ्याचे अंदाजे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलकापूर (ता. कळंब) येथील रहिवासी असलेले फिर्यादी अक्षयकुमार धन्यकुमार लोमटे (वय ३३) यांचे मलकापूर शिवारामध्ये गट नं. १११ मध्ये शेत आहे. गुरुवार, दिनांक २ मे २०२६ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेतातून आरोपी राजेश गणेश लोमटे (रा. मलकापूर) हा पाण्याचा टँकर घेऊन जात होता. यावेळी फिर्यादी अक्षयकुमार यांनी आपल्या शेताचे नुकसान होऊ नये म्हणून ‘शेतातून पाण्याचे टँकर घेऊन जाऊ नको’, असे आरोपीस सांगितले.
समजून सांगूनही या गोष्टीचा राग आल्याने आरोपी राजेश लोमटे याने अरेरावी करत जबरदस्तीने टँकर शेतातून घातला. एवढ्यावरच न थांबता त्याने जाणीवपूर्वक टँकरच्या तब्बल १०० फेऱ्या मारल्या. जड टँकरच्या सततच्या ये-जा मुळे शेतात चक्क गुडघ्याइतकी खोल चारी पडून अक्षयकुमार लोमटे यांचे अंदाजे ३०,००० रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. तसेच आरोपीने फिर्यादीस वारंवार दहशत दाखवून, शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या मनमानी आणि दहशत माजवणाऱ्या प्रकाराविरुद्ध अक्षयकुमार लोमटे यांनी येरमाळा पोलीस ठाण्यात धाव घेत दिनांक ०२ मे २०२६ रोजी प्रथम खबर दिली. या फिर्यादीवरून येरमाळा पोलिसांनी आरोपी राजेश लोमटे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२९(३), ३२४ (४), ३५२, आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.







