धाराशिव: सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पूर्वीच्या काळात संवर्ग बदलून नियुक्त्या देण्याचा जो झपाटा सुरू होता, त्याला आता मोठी चाप बसली आहे. आरोग्य विभागाने नुकताच एक मोठा निर्णय घेत संवर्ग बदलून कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. याला आरोग्य विभागाच्या इतिहासामधील आतापर्यंतचा सर्वांत मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’ म्हणून ओळखले जात आहे. या धडक कारवाईत धाराशिव जिल्ह्यातील ९ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
एकाच ठिकाणी आढळले एकाच स्पेशालिटीचे ८ MO
या कठोर निर्णयामागील कारणही तितकेच धक्कादायक आहे. माहितीनुसार, आरोग्य विभागाच्या सचिवांच्या एका भेटीदरम्यान एकाच ठिकाणी एकाच स्पेशालिटीचे (speciality) तब्बल ९ वैद्यकीय अधिकारी (MO) कार्यरत असल्याचे आढळून आले. मंजूर आकृतीबंधानुसार रुग्णालयांमध्ये विशेषज्ञ उपलब्ध असणे आवश्यक असताना, अशा प्रकारे संवर्ग बदलून सोयीच्या ठिकाणी नियुक्त्या मिळवल्याने अनेक रुग्णालयांमध्ये विशेषज्ञ सेवेवर विपरीत परिणाम होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. या प्रकाराची गंभीर दखल घेत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
धाराशिवमधील ‘या’ अधिकाऱ्यांचा समावेश
शासनाने काढलेल्या आदेशानुसार आणि यादीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या ९ अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. हे अधिकारी जिल्हा रुग्णालय धाराशिव, उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग, ग्रामीण रुग्णालय वाशी आणि ग्रामीण रुग्णालय तेर येथे कार्यरत होते.
गट-अ (एस-२३) संवर्गातील अधिकारी:
-
चंचला संभाजीराव बोडके (उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग)
-
गुरुबस नागनाथ बोटे (ग्रामीण रुग्णालय तेर)
-
संजय सुभाष सोनटक्के (जिल्हा रुग्णालय धाराशिव)
-
इस्माईल कासम मुल्ला (जिल्हा रुग्णालय धाराशिव)
-
मकद (मकरंद) परमेश्वर माने (जिल्हा रुग्णालय धाराशिव)
-
मौलजा (शैलजा) अनंतराव ठोंबरे (जिल्हा रुग्णालय धाराशिव)
-
डॉ. दयानंद बाबुराव कवडे (ग्रामीण रुग्णालय वाशी)
गट-अ (एस-२०) संवर्गातील अधिकारी:
-
डॉ. प्रशांत प्रकाश कोंडेकर (ग्रामीण रुग्णालय तेर)
-
डॉ. जगन्नाथ नरहरी कुलकर्णी (ग्रामीण रुग्णालय बैंबळी)
३० जूनपासून होणार कार्यमुक्त
शासनाच्या नवीन आदेशानुसार , संवर्ग बदलून (एस-२० व एस-२३ संवर्ग) कार्यरत असलेल्या या सर्व विशेषज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ३० जून २०२६ पासून सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात येणार आहे. तसेच, जुलै २०२६ पासून त्यांचे वेतन संवर्ग बदलून असलेल्या पदावरून काढण्यात येणार नाही, अशी सक्त ताकीदही देण्यात आली आहे.
या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आता त्यांच्या मूळ शैक्षणिक अर्हतेनुसार त्यांच्या मूळ संवर्गात नवीन पदस्थापना दिली जाणार असून, त्याचे आदेश स्वतंत्रपणे काढले जातील असे शासनाने स्पष्ट केले आहे. ज्यांच्यावर न्यायालयाची स्थगिती आहे त्यांना वगळता, या आदेशामुळे राज्यभरातील शेकडो वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असून आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.




