धाराशिव: रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट जिल्ह्यात वाढला असून, प्रशासकीय अनास्था आणि अधिकाऱ्यांच्या चालढकल वृत्तीमुळे हे प्रकार निर्ढावले आहेत. उमरगा येथील एका बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हा शल्यचिकित्सक (CS), उपजिल्हा रुग्णालय आणि तहसील कार्यालयात चकरा मारूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, ही अत्यंत संतापजनक बाब समोर आली आहे.
काय आहे प्रकरण?
उमरगा येथील साई नगर भागात डी. आर. साळुंके (ज्ञानेश्वर रघुनाथ साळुंके) नामक व्यक्ती ‘ज्ञानेश्वर क्लिनिक’ या नावाने रुग्णालय चालवत आहे. या व्यक्तीकडे कोणतीही वैध वैद्यकीय पदवी नसतानाही ते रुग्णांवर उपचार करत आहेत आणि रुग्णालयाच्या ठिकाणीच बेकायदेशीरपणे मेडिकलही चालवत आहेत. या गंभीर प्रकाराबाबत प्रफुल्ल श्रावण गायकवाड, अभंग वेळंबे आणि जाधव ज्ञानेश्वर यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलसह विविध स्तरांवर प्रशासनाकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या आहेत.
तक्रारीतील ठळक मुद्दे आणि पुरावे:
-
बोगस उपचार आणि आर्थिक लूट: रुग्णांना कोणत्याही प्रकारची पावती न देता, रोख आणि ऑनलाईन (QR कोड) पद्धतीने पैसे उकळले जात आहेत.
-
अन्न व औषध प्रशासनाचा (FDA) अहवाल: वैद्यकीय परवाना नसताना मेडिकल चालवत असल्याने, हा प्रकार ‘बोगस डॉक्टर’ प्रवर्गात मोडत असल्याचा स्पष्ट अहवाल अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांनी दिला आहे, तसेच संयुक्त कारवाईची मागणी केली आहे.
-
होमिओपॅथी परिषदेचा खुलासा: डॉ. साळुंके ज्ञानेश्वर रघुनाथ यांनी वैद्यकीय व्यवसाय बंद केल्याचे कळवल्यामुळे, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीने ५ जून २०१५ रोजीच त्यांची नोंदणी रद्द केली आहे.
चौकशी समितीचा फार्स आणि अधिकाऱ्यांवर संगनमराचे आरोप
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय उमरगाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. कोमल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. मात्र, या समितीच्या कार्यपद्धतीवरच तक्रारदारांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत.
तक्रारदार प्रफुल्ल गायकवाड यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिलेल्या पत्रानुसार:
-
वैद्यकीय अधीक्षकांनी अचानक छापा न टाकता, कारवाईला जाणीवपूर्वक विलंब लावला आणि बोगस डॉक्टरला पुरावे नष्ट करण्याची संधी दिली.
-
प्रत्यक्ष पाहणीत OPD कक्ष, मेडिकल काउंटर आणि ऑनलाईन पैसे स्वीकारण्याचे QR कोड आढळूनही कोणतीही दंडात्मक कारवाई न करता केवळ नोटिसा चिकटवण्याचा सोपस्कार पार पाडला गेला.
-
कारवाई करण्याऐवजी अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून, डॉक्टरची पदवी पडताळणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे पाठवली असल्याचे कारण पुढे करत वेळकाढूपणा केला जात आहे.
धाराशिव लाईव्हचा सवाल:
कर्नाटक सीमावर्ती भागातून आणि खेड्यापाड्यातून येणाऱ्या अडाणी आणि गरीब रुग्णांना उपचाराच्या नावाखाली लुटले जात आहे. सर्व पुरावे डोळ्यांसमोर असताना आणि गेल्या सहा महिन्यांपासून तक्रारदार कार्यालयांचे उंबरठे झिजवत असताना, आरोग्य विभाग नेमकी कोणाची पाठराखण करत आहे? प्रशासनाला कारवाईसाठी अजून किती रुग्णांच्या जीवाचा बळी जाण्याची प्रतीक्षा आहे?
अधिक पारदर्शक आणि निर्भीड बातम्यांसाठी वाचत राहा, धाराशिव लाईव्ह.





