धाराशिव – दुचाकी वाहनाची सर्व्हिसिंग एका दिवसांत करून न देता, तब्बल ९ दिवस लावल्यामुळे धाराशिवच्या सुझुकी कंपनीच्या टू व्हीलर डीलरला दहा हजार नुकसान भरपाई आणि आर्थिक आणि मानसिक त्रास दिल्याबद्दल १० हजार रुपये खर्च देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे.
धाराशिव येथील सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी ,सुझुकी कंपनीच्या टू व्हीलर डीलर डेक्कन व्हेलोसिटी प्रा. ली. यांच्याकडुन एक्सेस टू व्हीलर खरेदी केली होती. त्या वाहनाची मोफत सर्व्हिसिंग करण्यासाठी सुभेदार हे २९ जून २०२१ रोजी शोरूममध्ये गेले असता, बॅटरी खराब झाल्याचे सांगून, दुसऱ्या दिवशी वाहन देण्याचे कबूल केले, परंतु दुसऱ्या दिवशीही वाहन देण्यात आले नाही आणि त्यासाठी तब्बल ९ दिवस लावले. ९ जुलै २०२१ रोजी त्यांना त्यांची टू व्हीलर सर्व्हिसिंग करून मिळाली.
एका दिवसात सर्व्हिसिंग करून देण्याचा नियम असताना, त्यासाठी तब्बल ९ दिवस लावल्यामुळे सुभेदार यांनी ऍड. राज कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ऍड.गिरीश गोरे यांच्या मार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेतली. त्याची सुनावणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष किशोर वडणे, सदस्य मुकुंद सस्ते, वैशाली बोराडे यांच्यासमोर झाली.
त्याचा निकाल सव्वा दोन वर्षानंतर लागला असून, ग्राहक बाळासाहेब सुभेदार यांना सुझुकी कंपनीचे टू व्हीलर डीलर डेक्कन व्हेलोसिटी प्रा. ली. यांनी दहा हजार नुकसान भरपाई आणि मानिसक आणि आर्थिक त्रास दिल्याबद्दल १० हजार रुपये खर्च देण्याचा आदेश देण्यात आला आहे. धाराशिवच्या इतिहासात प्रथमच एखाद्या डीलरला सर्व्हिसिंग करण्यास विलंब दिल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.