धाराशिव | भाजपचे धाराशिव जिल्ह्याचे संपर्कमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या दौऱ्यादरम्यान प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे यांना मंत्र्यांची भेट घेण्यापासून रोखण्यात आल्याच्या घटनेचे पडसाद आता जिल्हाभर उमटू लागले आहेत. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील जुने पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्ते एकत्र येत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री जयकुमार गोरे यांची शिष्टमंडळासह भेट घेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
या भेटीत धाराशिवमध्ये घडलेला प्रकार, पक्षातील वातावरण, निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी तसेच जिल्हाभरातून उमटत असलेल्या प्रतिक्रियांची माहिती वरिष्ठ नेतृत्वासमोर मांडण्यात येणार असल्याचे समजते. यासाठी जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी आणि जुन्या कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे.
‘हुकूमशाही कारभाराविरोधात जुनी टीम एकवटली’
अनिल काळे यांच्या अपमानाच्या घटनेनंतर अनेक जुने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आहे. सोशल मीडियासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही संदेश पाठवून अनेकांनी आपली भूमिका व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत, पक्षात हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू असल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
’35 वर्षांच्या निष्ठेचा हा सन्मान?’
ॲड. अनिल काळे यांनी आरोप केला की, स्वतः आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीच त्यांना मंत्र्यांच्या भेटीपासून रोखले. गेली 35 वर्षे पक्षासाठी काम करूनही अशी वागणूक मिळत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “आम्ही भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत, गुलाम नाही,” असे सांगत त्यांनी हा प्रकार वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचविणार असल्याचे स्पष्ट केले.
कार्यपद्धतीवरही गंभीर आरोप
आमदार पाटील यांच्या पक्षांतर्गत कार्यपद्धतीवरही अनिल काळे यांनी टीका केली. गरजेनुसार पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे फोटो वापरणे, अनेकदा पक्षचिन्ह, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राष्ट्रीय नेतृत्वाला दुय्यम स्थान देणे, तसेच जुन्या पदाधिकाऱ्यांना सातत्याने डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच, अवैध प्रकारांना पाठीशी घालणे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे उदात्तीकरण होत असल्याचाही आरोप त्यांनी केला. आमदार पाटील यांचे पुत्र मेघ पाटील यांनी नुकतीच केलेली सोशल मीडिया पोस्टही पक्षविरोधी भूमिकेचे उदाहरण असल्याचा दावा करत, हा मुद्दाही वरिष्ठ नेतृत्वासमोर मांडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘कार्यकर्त्यांचा अपमान आता सहन करणार नाही’
“कार्यकर्त्यांना किरकोळ समजणे, त्यांचे योगदान कमी लेखणे आणि वारंवार अपमानित करणे ही प्रवृत्ती आता सहन केली जाणार नाही. राणा पाटील हे पक्षाचे मालक नाहीत. त्यांच्या वागणुकीमुळे निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले जात असून, पक्षालाच त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते,” असा इशारा अनिल काळे यांनी दिला.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे धाराशिव भाजपमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून, वरिष्ठ नेतृत्व याची दखल घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





