धाराशिव | परंडा तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे पेटलेला वाद अखेर निवळला आहे. शिक्षकांच्या मागणीसाठी शाळेला कुलूप ठोकणे, त्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर विद्यार्थ्यांनी शाळा भरवून केलेले अनोखे आंदोलन आणि ग्रामस्थांचा वाढता दबाव यानंतर प्रशासनाने तातडीने शिक्षक नियुक्तीचा आदेश काढला आहे.
सोनारी येथील शाळेत गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी प्रथम शाळेला कुलूप ठोकले. त्यानंतर शुक्रवारी विद्यार्थी व पालकांनी जिल्हा परिषद कार्यालयात धडक देत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोरच वर्ग भरवला. “शिक्षक द्या, तेव्हाच माघार” अशी ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेतल्याने जिल्हा परिषद परिसर घोषणांनी दणाणून गेला.
दरम्यान, या प्रश्नाची गंभीर दखल घेत आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी रवींद्र खंदारे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी तडजोड होणार नाही, असे स्पष्ट करत तातडीने शिक्षक उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने तातडीने हालचाली करत ३१ जुलै २०२६ रोजी शिक्षक नियुक्तीचा आदेश जारी केला. त्यानुसार जि.प. प्रशाला कळंब येथील माध्यमिक शिक्षक नितीन कोंडीबा गायसमुद्रे यांची तात्पुरत्या स्वरूपात जि.प. प्रशाला सोनारी (ता. परंडा) येथे विज्ञान व गणित विषयाच्या अध्यापनासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचे आंदोलन, ग्रामस्थांचा पाठपुरावा आणि आमदार तानाजीराव सावंत यांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर अवघ्या एका दिवसात शिक्षक नियुक्तीचा प्रश्न मार्गी लागल्याने सोनारीतील विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.





