धाराशिव – धाराशिव शहरातील देशपांडे स्टँड ते नेहरू चौक दरम्यान सुरू असलेल्या रस्ता दुरुस्ती आणि काँक्रीटीकरणाच्या निकृष्ट कामाविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. या रस्त्याचे काम नियमानुसार आणि चांगल्या दर्जाचे करण्यात यावे, अन्यथा कंत्राटदाराचे बिल अदा न करता त्याच्यावर व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवून कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.
नागरिकांच्या प्रमुख तक्रारी आणि आरोप:
१. घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती: जुना रस्ता न खोदताच त्यावर थेट सिमेंट काँक्रीटचा थर आंथरला जात आहे. यामुळे रस्त्याची उंची जुन्या रस्त्यापेक्षा आणि आजूबाजूच्या घरं व दुकानांपेक्षा जवळपास दीड फुटाने वाढली आहे. यामुळे पावसाचे व सांडपाणी थेट नागरिकांच्या घरात आणि दुकानांत शिरून मोठे नुकसान होत आहे.
२. निकृष्ट दर्जाचे काम: रस्ता तयार करताना आवश्यकतेनुसार लोखंडी सळ्या किंवा लाकडी बांध न वापरता अत्यंत हलक्या प्रतीचे काम केले जात आहे.
३. रस्त्याची रुंदी कमी केली: मूळ रस्ता ९ मीटर रुंदीचा असताना गुत्तेदार आपल्या सोयीनुसार विविध ठिकाणी रस्त्याची रुंदी कमी करत आहे.
४. भुयारी गटारांचे काम निकृष्ट: रस्त्याच्या मध्यभागातून केलेल्या भुयारी गटाराच्या ड्रेनेज लाईनचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून नाल्यांचे चेंबर लगेचच फुटून निघत आहेत.

कायदेशीर कारवाई व आंदोलनाचा इशारा:
नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे की, आम्ही नगर परिषदेचे नियमित करदाते आहोत. प्रशासनाने योग्य दर्जाच्या सोयी-सुविधा देणे कायद्याने बंधनकारक आहे. जर गुत्तेदाराने नियमानुसार काम केले नाही तर त्याला कसलेही बिल अदा करू नये. जर चुकीच्या कामाचे अहवाल देऊन बिल मंजूर केले गेले, तर संबंधित अभियंते व अधिकाऱ्यांवरही पैशाच्या अपहाराचा गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, काम न सुधारल्यास महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम १९६५ च्या कलम ३०४ आणि सी.पी.सी. कलम ८० अन्वये या निवेदनाची कायदेशीर नोटीस म्हणून दखल घेऊन न्यायालयात (दीवाणी व फौजदारी) याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हे निवेदन ३१ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगर परिषद धाराशिव येथे दाखल करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती प्रधानमंत्री कार्यालय (नवी दिल्ली), नगर विकास मंत्री (महाराष्ट्र), विभागीय आयुक्त (छत्रपती संभाजीनगर), खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनाही माहितीस्तव पाठवण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर शैलेश देव, आभावरी कुलकर्णी, नलिनी कुलकर्णी, कुणाल कुलकर्णी, महेश कुलकर्णी, प्रेमसिंग राजपूत, लक्ष्मण मैदाड , दिनेश खळदकर , माजी नगरसेविका प्रमिला कामे , योगेश कामे यांच्यासह महादेव गल्ली, भिसे चौक, नेहरू चौक, मुख्य बाजारपेठ व कसबा राम मंदिर परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


