तुळजापूर – तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे बोअरवेलचे पाणी घेण्याच्या किरकोळ कारणावरून पती-पत्नीला शिवीगाळ करत लोखंडी रॉड व काठीने जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत दोघे जखमी झाले असून, याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
सावरगाव (ता. तुळजापूर) येथील रहिवासी धनाजी भारत काळे (वय ३७ वर्षे) व त्यांची पत्नी हे १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास सावरगाव येथे असताना, बोअरवेलचे पाणी घेण्यावरून गावातीलच काही व्यक्तींसोबत त्यांचा वाद झाला.
या वादातून अनिकेत नाना कोळी, नाना कोळी आणि लखन कोळी (सर्व रा. सावरगाव, ता. तुळजापूर) यांनी संगनमत करून धनाजी काळे व त्यांच्या पत्नीला अश्लील शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांसह लोखंडी रॉड व काठीने अमानुष मारहाण करून दोघांनाही जखमी केले.
तामलवाडी पोलिसांत गुन्हा नोंद
उपचार घेतल्यानंतर याप्रकरणी जखमी धनाजी काळे यांनी २६ ऑगस्ट २०२६ रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी आरोपी अनिकेत कोळी, नाना कोळी आणि लखन कोळी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तामलवाडी पोलीस करत आहेत.





