तुळजापूर- श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या एका महिला भाविकाच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे सोन्याचे दागिने गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने लंपास केले आहेत. गणपती मंदिर ते महाद्वार दरम्यान ही चोरी झाली असून, याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मूळच्या माजलगाव (ता. पाटण, जि. सातारा) येथील आणि सध्या धायरी (पुणे, श्रीलक्ष्मी वृंदावन सोसायटी) येथे वास्तव्यास असलेल्या नलिनी गुलाबराव भोसले (वय ५९ वर्षे) या आपल्या कुटुंबासह कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आल्या होत्या.
दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.५० ते ११.०० वाजेच्या सुमारास दर्शन आटोपून परतत असताना, मंदिरातील गणपती मंदिर ते महाद्वार या मार्गावर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने नलिनी भोसले यांच्या गळ्यातील १ लाख रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने शिताफीने चोरून नेले.
तुळजापूर पोलिसांत गुन्हा नोंद
गळ्यातील सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी परिसरात शोध घेतला; मात्र काहीही थांगपत्ता न लागल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठले. नलिनी भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २८ ऑगस्ट २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तुळजापूर पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहेत.



