तुळजापूर – तुळजापूर येथील जुन्या बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना गर्दीचा गैरफायदा घेऊन एका महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
धाराशिव शहरातील तांबरी विभाग, संविधान कॉलनी येथील रहिवासी राधा उमाकांत भोसले (वय ४० वर्षे) या आपल्या मैत्रिणीसह जुने तुळजापूर बसस्थानक येथे आल्या होत्या.
दुपारी १२.०० ते १.०० वाजेच्या सुमारास त्या उमरगा ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने अत्यंत हुशारीने त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण चोरून नेले. बसमध्ये बसल्यानंतर गळ्यातील गंठण चोरीला गेल्याचे राधा भोसले यांच्या लक्षात आले.
तुळजापूर पोलिसांत गुन्हा नोंद
बसस्थानक परिसरात शोध घेऊनही दागिना मिळून न आल्याने राधा भोसले यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २८ ऑगस्ट २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळजापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




