धाराशिव : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्याबाबत घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे सांगत माजी आरोग्यमंत्री तथा भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी या प्रकरणाशी आपला किंवा आपल्या कार्यालयाचा कोणताही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध नसल्याचा खुलासा केला आहे.
प्रा. डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले की, २०२२ ते २०२४ या कालावधीत आपण महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री असताना किंवा आपल्या कार्यालयामार्फत या घटनेशी संबंधित कोणतीही बाब घडलेली नाही.
या प्रकरणात नाव आलेले प्रसाद कोंडे-देशमुख हे आपल्या कार्यालयात OSD किंवा PA (स्वीय सहाय्यक) म्हणून कधीही कार्यरत नव्हते आणि सध्या देखील कार्यरत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच, प्रसाद कोंडे-देशमुख यांच्याशी आपला कोणताही संबंध नाही, असे सावंत यांनी ठामपणे नमूद केले.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्याबाबत घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे सांगत, या प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठीच हा खुलासा करत असल्याचे प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी म्हटले आहे.





