नळदुर्ग – तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (नळ) येथील इंदिरानगर तांडा येथे जागेच्या वादावरून एका ६० वर्षीय वृद्ध महिलेला गैरकायद्याची मंडळी जमवून लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील ८ जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
इंदिरानगर तांडा, हंगरगा (नळ) येथील रहिवासी छमाबाई सुभाष राठोड (वय ६० वर्षे) या १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास तांड्यात असताना जागेच्या कारणावरून वाद झाला.
या कारणावरून गावातीलच चांगुनाबाई हिरू चव्हाण, शारूबाई वसंत चव्हाण, पंडूबाई प्रकाश चव्हाण, वसंत हिरू चव्हाण, प्रकाश हिरू चव्हाण, जिगर प्रकाश चव्हाण, करण वसंत चव्हाण आणि हिरू ठाकरू चव्हाण (सर्व रा. इंदिरानगर तांडा, हंगरगा नळ) यांनी बेकायदेशीर जमाव जमवला. आरोपींनी छमाबाई यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉडने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
नळदुर्ग पोलिसांत गुन्हा नोंद
उपचार घेतल्यानंतर याप्रकरणी ४ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात संबंधित ८ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९०, १९१(२) आणि १९१(३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.






