धाराशिव: ५ सप्टेंबर, म्हणजेच शिक्षक दिन! एरवी या दिवशी गुरुजींचा शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान केला जातो. पण धाराशिव जिल्हा परिषदेच्या ‘व्हिजन २०३०’च्या भोंगळ कारभाराने इथल्या शिक्षण व्यवस्थेचा इतका खेळखंडोबा केला आहे की, याच पवित्र दिवशी गुरुजींना काळ्या फिती लावून थेट रस्त्यावर साखळी उपोषणाला बसावे लागले आहे! ‘आपला जीव धाराशिव’ म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी शिक्षकांचा जीव कसा मेटाकुटीला आणला आहे, याचे हे जिवंत आणि संतापजनक उदाहरण आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाहायला मिळाले.
प्रमोशन घोटाळ्याचा संताप आणि आमदारांची एन्ट्री
शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नतीत झालेले ५ ते ७ लाखांचे ‘अर्थपूर्ण’ व्यवहार आणि नियमबाह्य एकत्रीकरण याविरोधात ‘धाराशिव जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समिती’ने आजपासून बेमुदत साखळी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. पहिल्याच दिवशी या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आंदोलनाची धग आणि शिक्षकांचा रोष पाहून ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी थेट उपोषणस्थळी धाव घेतली. त्यांनी उपोषणकर्त्या गुरुजींसोबत सविस्तर चर्चा केली. विशेषतः या पदोन्नतीच्या बाजार मांडणीत ज्या दिव्यांग शिक्षकांना डावलून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे, त्यांना हक्काचा न्याय मिळवून दिला जाईल, असा भक्कम शब्द आमदार कैलास पाटील यांनी यावेळी दिला.
‘माऊली’ पोहोचल्या, पण गुरुजी बधले नाहीत!
दीडशे-दोनशे कोटींच्या नव्या इमारती आणि स्वतःसाठी भाड्याच्या गाड्यांच्या ठरावांमध्ये मग्न असलेल्या झेडपी अध्यक्षा अर्चना पाटील (माऊली) यांनाही अखेर या आंदोलनाचा धसका घ्यावा लागला. वातावरण तापल्याचे पाहून त्यांनीही थेट उपोषणस्थळी जाऊन शिक्षकांची भेट घेतली. पण यावेळी गुरुजी सत्ताधाऱ्यांच्या गोड गोड भूलथापांना बळी पडायला अजिबात तयार नाहीत. १० ऑगस्टच्या आंदोलनानंतर प्रशासनाने फक्त ‘शासनाचे मार्गदर्शन मागवू’ असे तोंडी आश्वासन देऊन वेळ मारून नेली होती. पण आता गुरुजींनी प्रशासनाची ही चाल ओळखली आहे.
‘लेखी’ द्या, तरच उठू!
समन्वय समितीने माऊली आणि झेडपी प्रशासनाला थेट ठणकावून सांगितले आहे की, जोपर्यंत पदोन्नती प्रक्रियेतील अनियमितता दूर करून मागण्या मान्य केल्याचे अधिकृत ‘लेखी आदेश’ हातात पडत नाहीत, तोपर्यंत हे साखळी उपोषण मागे घेतले जाणार नाही. तोंडी आश्वासनांचे फुगे आता चालणार नाहीत.
या लढ्याला बळ देण्यासाठी आणि प्रशासनाची कोंडी करण्यासाठी जास्तीत जास्त शिक्षक बंधू-भगिनींनी ठरलेल्या वेळापत्रकानुसार साखळी उपोषणात सहभागी व्हावे, असे खणखणीत आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे. साहेब आणि माऊलींच्या मनमानी कारभाराला आता गुरुजींनीच रस्त्यावर उतरून ‘ब्रेक’ लावल्याने, धाराशिव झेडपीमध्ये सध्या मोठी अस्वस्थता पसरली आहे!






