नळदुर्ग – तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे पडीक शेतात जनावरे सोडल्याच्या कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीत दोन्ही बाजूंचे लोक जखमी झाले असून, दगड, लोखंडी रॉड आणि कुऱ्हाडीचा वापर करण्यात आला. याप्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारींवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात एकूण १४ जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
पहिली तक्रार : जनावरे शेतात सोडल्याच्या वादातून दगडाने मारहाण
निळकंठ लक्ष्मण घोडके (वय ४४ वर्षे, रा. अणदूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजेच्या सुमारास अणदूर येथील पडीक शेत गट नं. १५७/३/२ मध्ये जनावरे का सोडली, या कारणावरून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवला. आरोपी प्रवीण प्रकाश घोडके, भरत विलास घोडके, सतीश विलास घोडके, लता प्रकाश घोडके, श्रीदेवी सतीश घोडके आणि विलास बिरू घोडके (सर्व रा. अणदूर) यांनी निळकंठ घोडके यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी निळकंठ घोडके यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिसांनी वरील ६ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९० आणि १९१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी तक्रार : शेतातून जनावरे काढण्यास सांगितल्यावरून कुऱ्हाड व रॉडने हल्ला
तर दुसऱ्या बाजूने भरत विलास घोडके (वय ३५ वर्षे, रा. अणदूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याच दिवशी आणि त्याच वेळी पडीक शेतातून “जनावरे बाहेर काढ” असे सांगितल्याचा राग मनात धरून आरोपींनी बेकायदेशीर मंडळी जमवली. आरोपी निळकंठ लक्ष्मण घोडके, ओंकार निळकंठ घोडके, समर्थ निळकंठ घोडके, शिवाजी लक्ष्मण घोडके, लक्ष्मण निलाप्पा घोडके, लक्ष्मी निळकंठ घोडके, सत्यभामा शिवाजी घोडके आणि रेखाबाई लक्ष्मण घोडके (सर्व रा. अणदूर) यांनी भरत घोडके यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांसह लोखंडी रॉड व कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी भरत घोडके यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिसांनी वरील ८ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२) आणि १९० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.





