नळदुर्ग – तुळजापूर तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर गावातील तरुणांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुसऱ्या एका तरुणासोबत लग्न करण्यासाठी दबाव टाकत बेल्टने बेदम मारहाण केल्याचा व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकारही घडला असून, याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेसह पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील १३ वर्षे १ महिना वय असलेल्या अल्पवयीन बालिकेवर २ फेब्रुवारी २०२६ ते मे २०२६ या कालावधीत गावातीलच दोन तरुणांनी वारंवार लैंगिक अत्याचार केला.
यादरम्यान आरोपींनी पीडित बालिकेला एका तरुणासोबत लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली. तिने नकार दिला असता तिला बेल्टने बेदम मारहाण करून जखमी करण्यात आले. तसेच या प्रकाराबाबत कुठेही वाच्यता केल्यास पीडितेला व तिच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी आरोपींनी दिली.
पोक्सो कायद्यासह BNS अंतर्गत गुन्हा नोंद
आरोपींच्या त्रासाला व अत्याचाराला कंटाळून अखेर पीडित बालिकेने ७ सप्टेंबर २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. तिच्या प्रथम खबरेवरून नळदुर्ग पोलिसांनी आरोपींविरुद्ध खालील कायद्यांन्वये गुन्हा दाखल केला आहे:
-
बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायदा २०१२: कलम ४, ६, ८, १२, १७
-
भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ६४(१), ६४(२)(एम)(आय), ११८(१), ३५१(२) आणि ३(५)
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली असून, पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलीस या गुन्ह्याचा सखोल तपास करत आहेत.



