उमरगा – न्यायालयात दावा सुरू असलेल्या घराच्या जागेच्या जुन्या वादावरून एका व्यक्तीला जातीवाचक हीन दर्जाची शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना उमरगा शहरात घडली आहे. एवढेच नव्हे तर पारेच्या साहाय्याने घराची भिंत पाडून नुकसान करण्यात आले असून, याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
जवाहर शास्त्री नगर, औटी प्लॉट (उमरगा) येथील रहिवासी शिवाजी अर्जुन भोसले (वय ३७ वर्षे) यांच्या घराच्या जागेचा वाद आरोपींसोबत न्यायालयात प्रलंबित आहे. या कारणाचा राग मनात धरून ५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास एकोंडी रोड, मुन्सी प्लॉट (उमरगा) येथील कमलबाई गोपीनाथ राठोड व त्यांच्या साथीदारांनी फिर्यादी शिवाजी भोसले यांच्याशी वाद घातला.
वाद घालत असताना आरोपींनी शिवाजी भोसले यांना जातीवाचक अश्लील शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच पारेच्या साहाय्याने घराची भिंत पाडून आर्थिक नुकसान केले.
ॲट्रॉसिटीसह BNS अंतर्गत गुन्हा नोंद
याप्रकरणी शिवाजी भोसले यांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी कमलबाई राठोड व इतरांविरुद्ध खालील कायद्यांन्वये गुन्हा दाखल केला आहे:
-
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा: कलम ३(१)(आर), ३(१)(एस)
-
भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ११५(२), ३५२, ३(५) आणि ३२४(४)
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा पोलीस करत आहेत.





