धाराशिव – धाराशिव तालुक्यातील शिंगोली येथील आश्रमशाळा व व्हॉलीबॉल ग्राउंडच्या कट्ट्यावर एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत उचलून रस्त्यावर आपटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्राणघातक हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
शिंगोली (ता. जि. धाराशिव) येथील रहिवासी आदर्श रोहीदास आडे हे ३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.०० ते सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास शिंगोली आश्रमशाळा व लमाणतांडा येथील व्हॉलीबॉल ग्राउंडच्या कट्ट्यावळ थांबले होते.
त्यावेळी जहागीरदारवाडी तांडा (ता. जि. धाराशिव) येथील रहिवासी रितेश अच्युत चव्हाण हा तिथे आला. “तू शाळेत शिवीगाळ का केली?” या कारणाचा जाब विचारत रितेशने आदर्श आडे यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांना उचलून थेट रस्त्यावर आपटले, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. तसेच पुन्हा वाद घातल्यास जीवे ठार मारण्याची धमकी आरोपीने दिली.
आनंदनगर पोलिसांत गुन्हा नोंद
उपचार घेतल्यानंतर आदर्श आडे यांनी १३ सप्टेंबर २०२६ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी आरोपी रितेश अच्युत चव्हाण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११७(२), ११५(२), ३५२ आणि ३५१(२)(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आनंदनगर पोलीस करत आहेत.





