परंडा : आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ३५ वर्षीय तरुणाला अडवून लाथाबुक्क्यांसह लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना परंडा तालुक्यातील आवार पिंपरी येथे घडली आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गावातीलच एका संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आवार पिंपरी (ता. परंडा, जि. धाराशिव) येथील रहिवासी राजकुमार अशोक गुडे (वय ३५ वर्षे) हे ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १:१५ वाजेच्या सुमारास गावात असताना हा प्रकार घडला. गावातीलच संशयित आरोपी महेश मारुती गुडे याने आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून राजकुमार गुडे यांना अडवून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी महेश गुडे याने राजकुमार यांना लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉडने जोरदार मारहाण केली. या हल्ल्यात राजकुमार गुडे गंभीर जखमी झाले असून, आरोपीने त्यांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.
उपचारानंतर राजकुमार गुडे यांनी १७ नोव्हेंबर रोजी परंडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून परंडा पोलिसांनी आरोपी महेश मारुती गुडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२) (धोकादायक शस्त्राने गंभीर दुखापत करणे), १२६(२) (बेकायदेशीररीत्या रस्ता अडवणे), ३५१(२) (जीवे मारण्याची धमकी) आणि ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.



