नळदुर्ग (तुळजापूर) : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर पवनचक्कीचे पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रकला स्कॉर्पिओ गाडी आडवी लावून रस्ता रोखत खंडणीची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. “कंपनीच्या गाड्या जाऊ देण्यासाठी पैसे द्या, नाहीतर येथून जाऊ देणार नाही” अशी धमकी दिल्याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तुळजापूर आणि लातूर जिल्ह्यातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणा राज्यातील भिवानी जिल्ह्यातील मूळ रहिवासी व सध्या खसगी (ता. उमरगा, जि. धाराशिव) येथे वास्तव्यास असलेले विनीत सोहमीरसिंग तवार (वय २२ वर्षे, रा. तिंगडाना, ता. भवानीखेडा, जि. भिवानी) हे कंपनीच्या कामाशी संबंधित आहेत. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:१५ वाजेच्या सुमारास कंपनीच्या पवनचक्कीचे पाईप घेऊन जाणारा ट्रक सोलापूर-हैदराबाद महामार्गावरून जात होता.
फुलवाडी टोलनाका येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ संशयित आरोपी मृणाल सोमनाथ कांबळे, शशिकांत मालू देडे (दोघे रा. काटगाव, ता. तुळजापूर), अक्षय नंदकुमार कांबळे (रा. गरुड चौक, लातूर) आणि कुणाल हनुमंत गोरे (वय १९ वर्षे, रा. मोतीनगर, मुरुड, ता. जि. लातूर) यांनी आपली स्कॉर्पिओ गाडी ट्रकला आडवी लावून रस्ता अडवला. यावेळी आरोपींनी विनीत तवार यांना कंपनीच्या गाड्या पुढे जाऊ देण्यासाठी पैशांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास गाड्या जाऊ देणार नाही, अशी धमकी दिली.
या प्रकारानंतर विनीत तवार यांनी त्याच दिवशी (१६ नोव्हेंबर) नळदुर्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलिसांनी नमूद चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२६(२) (बेकायदेशीररीत्या रस्ता अडवणे), ३०८(३) (खंडणी मागणे), ३५१(२) (गुन्हेगारी धमकी) आणि ३(५) (समान उद्देशाने एकत्रित गुन्हा करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.



