धाराशिव : जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करत आळणी फाटा (ढोकी टी पॉईंट) येथे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग (NH-52) तब्बल पाच तास रोखून धरल्याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात ११ प्रमुख आंदोलकांसह इतर १०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन प्रवाशांचे मोठे हाल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १:२१ ते सायंकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास आळणी शिवारातील आळणी फाटा (ढोकी टी पॉईंट) येथे सोलापूर ते धुळे या राष्ट्रीय महामार्गावर (NH-52) हा रस्ता रोको करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदी आदेश लागू असतानाही आंदोलकांनी बेकायदेशीररीत्या जमाव जमवून महामार्गावरून ये-जा करणारी वाहने अडवली आणि रहदारीस मोठा अडथळा निर्माण करत महामार्ग रोखून धरला.
याप्रकरणी फिर्यादी तानाजी काळे यांनी १६ नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून धाराशिव ग्रामीण पोलिसांनी रविंद्र इंगळे (रा. तुळजापूर), संग्राम देशमुख (रा. ढोकी), रामेश्वर पाटील (रा. शिराढोण), अशोक देशमुख (रा. येडशी), तुषार वाघमारे (रा. बाभळगाव), आलताफ शेख (रा. सुंभा), शेषेराव साळुंखे (रा. तुळजापूर), गणेश जमाले (रा. तडवळा), राजेश्वर पाटील (रा. शिराढोण), तानाजी पाटील (रा. शिराढोण), इंद्रजित कचरे आणि इतर १०० जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२) (बेकायदेशीर जमाव), १९०, १२६(२) (बेकायदेशीररीत्या रस्ता अडवणे), २२३ (शासकीय आदेशाचे उल्लंघन), २८५ (सार्वजनिक रस्त्याला अडथळा निर्माण करणे) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस करत आहेत.




