उमरगा : दुचाकीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून वाद उफाळून येत गैरकायद्याची मंडळी जमवून दोघांना लोखंडी पाईप, काठी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात दोन महिलांसह एकूण आठ जणांविरुद्ध दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नारंगवाडी (ता. उमरगा, जि. धाराशिव) येथील रहिवासी पंडित बाबुराव गायकवाड (वय ३८ वर्षे) आणि मुद्दीका निवृत्ती कांबळे हे ११ नोव्हेंबर रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास गावात असताना हा प्रकार घडला. मोटरसायकलला कट मारल्याच्या कारणावरून गावातीलच संशयित आरोपींशी त्यांचा वाद झाला.
या वादातून राहुल दलाले, कृष्णा दलाले, बाळू विठ्ठल कांबळे, रत्नदीप सूर्यवंशी, शिवम कांबळे, कृष्णा मनाळे, मीनाबाई दलाले आणि सोनाली कांबळे (सर्व रा. नारंगवाडी, ता. उमरगा) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवली. सर्व आरोपींनी संगनमत करून पंडित गायकवाड व मुद्दीका कांबळे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत लोखंडी पाईप, लाकडी काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच, त्यांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.
उपचारानंतर पंडित गायकवाड यांनी १६ नोव्हेंबर रोजी उमरगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून उमरगा पोलिसांनी नमूद आठही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१) (धोकादायक साधनाने दुखापत करणे), १८९(२) (बेकायदेशीर जमाव), १९१(२), १९१(३) (दंगल करणे), १९०, ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान) आणि ३५१(२)(३) (जीवे मारण्याची धमकी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.




