धाराशिव: दोन वर्षे डोळ्यादेखत पिकं पाण्यात सडून गेली, तेव्हा बळीराजा ओल्या दुष्काळाच्या डोहात बुडाला होता; यंदा पावसाने अशी काही पाठ फिरवली की काळी आई भेगाळली आणि कोरड्या दुष्काळाची भीषण कुऱ्हाड कोसळली. आभाळातून आगीच्या ठिणग्या पडाव्यात तशी स्थिती शिवारात आहे. सोयाबीनचं जाळ जागेवरच कोळसा झालंय, हाता-तोंडाशी आलेला ऊस पाण्यासाठी तळमळतोय आणि लाखो रुपये खर्चून जोपासलेल्या फळबागा डोळ्यादेखत मोडीत निघत आहेत. शिवारात आता पिकांच्या ऐवजी संकटांचे डोंगर उभे ठाकले आहेत.
कारखान्याचा ऊस जनावरांच्या दावणीला
जिथे साखर कारखान्यांच्या धुराड्यांसाठी उसाचे ट्रकच्या ट्रक भरून जायचे, तिथे आज परिस्थिती अशी विदारक झाली आहे की, उभे ऊस तोडून मुक्या जनावरांच्या दावणीला चारा म्हणून टाकावे लागत आहेत. शेतकरी हवालदिल झालाय; स्वतःच्या पोटाची खळगी कशी भरायची हा प्रश्न असताना, दावणीला बांधलेल्या मुक्या जनावरांना पाणी कुठून पाजायचं आणि चारा कुठून आणायचा, या विवंचनेत बळीराजाचे डोळे पाणावले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचा ‘चारा नाकाबंदी’चा फतवा
दुष्काळाच्या या तीव्र झळा पाहून अखेर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक कडक आदेश जारी केला आहे:
-
जिल्ह्याबाहेर चारा नेण्यास सक्त मनाई: कडबा, सुका चारा, घास, वाडे जिल्ह्याबाहेर व्यावसायिक कारणांसाठी विकण्यावर पूर्णपणे बंदी.
-
वाहन जप्तीसह गुन्हे: आदेश धुडकावणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई आणि वाहने जप्त करण्याचे आदेश.
-
सीमांवर नाकाबंदी: पोलीस आणि महसूल यंत्रणेला चेकपोस्टवर कडक पहारा ठेवण्याच्या सूचना.
स्थानिक पशुधनाचे प्राण वाचवण्यासाठी उपलब्ध चारा जिल्ह्यातच राहिला पाहिजे, असा प्रशासनाचा दावा आहे.
शेतकऱ्यांचा थेट सवाल: “साहेब, चारा शिल्लक कुठेय जो बाहेर पाठवायला?”
एकीकडे प्रशासनाचा आदेश धडकला असला, तरी गाव-खेड्यातील शेतकऱ्यांमधून एकच संतप्त आणि तितकाच वास्तववादी सवाल उपस्थित केला जात आहे. “साहेब, जमिनीवर एक गवताची काडी शिल्लक नाही, सोयाबीन-बाजरी जागेवर जळाली, विकायला शिल्लक काय आहे जे जिल्ह्याबाहेर जाणार? बंदी कसली घालताय? आम्हाला जिल्ह्याबाहेरून चारा आयात करावा लागणार आहे, त्याचे काय नियोजन केले?”
कागदावरचे नियम आणि शिवारातली जळती माती यातील अंतर प्रचंड वाढले आहे. प्रशासनाने बंदीचे नियम जरूर लावावेत, पण त्यासोबतच छावण्या, पाण्याचे टँकर आणि परजिल्ह्यातून चारा आणण्यासाठी तातडीने तिजोरी उघडावी, हीच आजच्या घडीला धाराशिवच्या बळीराजाची आर्त हाक आहे.




