कळंब – धुळे-चाळीसगाव महामार्गावर जामखेड कलाकेंद्रातील गरोदर नर्तिका पिंकी काटकर हिचा निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत जाळल्याच्या धक्कादायक प्रकरणातील फरार महिला व पुरुष आरोपींना कळंब पोलिसांनी सिनेनाट्यमयरीत्या सापळा रचून जेरबंद केले आहे. गुन्ह्यात वापरलेली होंडा मोबिलो कारही पोलिसांनी हस्तगत केली असून, दोन्ही आरोपींना धुळे जिल्ह्यातील मोहाडीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
धुळे महामार्गावर आढळला होता गरोदर नर्तिकेचा जळालेला मृतदेह
२२ सप्टेंबर २०२६ रोजी धुळे जिल्ह्यातील नरवाळ शिवारात चाळीसगाव ते धुळे महामार्गावरील मुरमा टेकडीलगत वनक्षेत्रातील निर्जन ठिकाणी एका अज्ञात गरोदर महिलेचा मारहाण करून खून केल्यानंतर तिचे प्रेत जाळण्यात आल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी मोहाडीनगर पोलीस ठाण्यात (जि. धुळे) गु.र.नं. ३२२/२०२६, कलम १०३(१) भा.न्या.सं. अन्वये खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
तपासादरम्यान मयत महिला ही जामखेड कलाकेंद्रातील नर्तिका पिंकी हनुमंत काटकर (वय ३१ वर्षे) असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यात सामील असलेले आरोपी १) सरफराज ऊर्फ शफीक अलीम मोमीन (वय ३८ वर्षे), २) आरीफ ऊर्फ खुज्या आसीफ शेख (वय ३१ वर्षे), ३) लक्ष्मी बालाजी पवार (वय ३० वर्षे) आणि ४) स्वाती ऊर्फ आरती गणेश कुहाडे यांना यापूर्वीच धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जेरबंद करून धुळे पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र, गुन्ह्यातील इतर दोन मुख्य आरोपी गुन्ह्यात वापरलेल्या होंडा मोबिलो कारसह फरार होते.
कळंब-केज रोडवरील हॉटेल ७/१२ समोर रचला सापळा
२७ सप्टेंबर २०२६ रोजी कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख यांना गोपनीय बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली की, मोहाडीनगर हद्दीतील या थरारक हत्याकांडातील फरार महिला व पुरुष आरोपी कळंब येथून केज रोडवर जेवणासाठी जाणार आहेत.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केज रस्त्यावरील हॉटेल ७/१२ समोर अंधारात सापळा लावला. संशयित हालचाली दिसताच पथकाने दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपली नावे खालीलप्रमाणे सांगितली:
-
ताब्यात घेतलेले आरोपी:
१) फारुख हजू शेख (वय २९ वर्षे, रा. सुर्डी, ता. केज, जि. बीड; सध्या रा. शेरे गल्ली, कळंब)
२) रोहिणी स्वप्निल जाधव उर्फ माधुरी महेंद्र मेघे (वय २६ वर्षे, रा. जामखेड कलाकेंद्र; मूळ रा. समाधान हॉटेलजवळ, केंब्रिज चौक, छत्रपती संभाजीनगर)
नंबर प्लेट नसलेली मोबिलो कारही जप्त; आरोपी धुळे पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांनी तत्काळ आरोपींचे फोटो काढून मोहाडीनगर पोलिसांना पाठवून खात्री केली. त्यानंतर दोघांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना अधिक तपासासाठी मोहाडीनगर (जि. धुळे) पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तसेच या हत्याकांडासाठी वापरलेली व नंबर प्लेट काढून कळंब शहरात बेवारस स्थितीत सोडलेली होंडा कंपनीची पांढऱ्या रंगाची मोबिलो कार (क्रमांक MH 43 AR 4070) पोलिसांनी जप्त करून धुळे पोलिसांच्या स्वाधीन केली आहे.
पोलीस पथकाची धडक कामगिरी
सदरची उल्लेखनीय कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शकील शेख, सपोनि समाधान बजबळकर, पोलीस हवालदार महादेव मुंडे (ब.नं. १००६), अजीज शेख (ब.नं. ८४) तसेच महिला पोलीस अंमलदार सपना गीते (ब.नं. ६०२) यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.






