कळंब : कळंब तालुक्यातील हावरगाव येथील भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी संबंधित ‘डीडीएन शुगर अँड केमिकल्स’ (DDN SFA Ltd.) कारखान्याकडून ऊस वाहतूकदार आणि तोडणी ठेकेदारांचे कोट्यवधी रुपयांचे थकीत बिल व कमिशन थकवल्याने संतापाची तीव्र लाट उसळली आहे. वारंवार विनंत्या करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज, २९ सप्टेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता संतप्त झालेल्या वाहतूकदार आणि वाहन चालकांनी कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पैसे मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
घामाच्या पैशांसाठी ठेकेदार रस्त्यावर
सन २०२५-२६ च्या गळीत हंगामात वाहनधारक आणि मजुरांनी ऊस तोडणी व वाहतुकीचे काम प्रामाणिकपणे पूर्ण केले. मात्र, गळीत हंगाम संपून महिने उलटले तरी कारखान्याने तोडणी व वाहतुकीची बिले आणि कमिशन अदा केलेले नाही. यामुळे वाहनांचे बँकेचे हफ्ते, कर्ज, वाहनांचा दुरुस्ती खर्च भागवणे अशक्य झाले असून शेकडो चालक-मालकांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. “ऊस पुरवठा अधिकारी आणि शेतकी अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आम्ही ऊस आणून घातला, मात्र आता हक्काच्या पैशांसाठी आम्हाला भीक मागितल्यासारखे फिरवले जात आहे,” असा थेट आरोप आंदोलकांनी केला आहे.
सामूहिक आत्मदहनाचा थेट इशारा
याप्रकरणी ठेकेदारांनी २३ सप्टेंबर रोजीच कळंबचे तहसीलदार, पोलीस ठाणे आणि कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना लेखी निवेदन दिले होते. २९ सप्टेंबरपर्यंत तोडगा न निघाल्यास आंदोलन करण्याचा इशारा आधीच दिला गेला होता. तरीही सत्ताधारी आमदाराशी संबंधित कारखाना प्रशासनाने याकडे सोयीस्कर डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे.
आंदोलकांनी आता आक्रमक भूमिका घेतली असून, “थकीत बिले घेतल्याशिवाय आम्ही कारखान्याचे गेट सोडणार नाही. आमचे कामकाज बंद आंदोलन सुरूच राहील आणि तरीही प्रशासनाने दखल घेतली नाही तर कारखान्याच्या गेटसमोरच सर्व ठेकेदार व चालक सामूहिक आत्मदहन करतील,” असा थेट व कडक इशारा दिला आहे. सत्ताधारी आमदाराच्या कारखान्याविरोधात सुरू झालेल्या या ठिय्या आंदोलनामुळे धाराशिव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.






