भूम – भूम तालुक्यातील साबळेवाडी परिसरातून मध्यरात्री शेळ्या चोरून नेणाऱ्या टोळीचा धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी भूम बसस्थानक परिसरात छापा टाकून मुख्य संशयितासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, पकडण्यात आलेला मुख्य आरोपी धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्कीच्या तारा चोरीच्या तब्बल १४ गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा पिकअप, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेमकी कारवाई कशी झाली?
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक २९ सप्टेंबर २०२६ रोजी मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, भूम पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या शेळी चोरीच्या गुन्ह्यातील (गु.र.नं. ४९८/२०२६, कलम ३०३(२) BNS) संशयित आरोपी भूम बसस्थानक परिसरात फिरत आहेत.
माहिती मिळताच पथकाने बसस्थानक परिसरात सापळा रचून छापा टाकला आणि दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी २१ सप्टेंबर २०२६ च्या मध्यरात्री साबळेवाडी शिवारातून शेळ्यांची चोरी करून त्या मुरुम येथील जनावरांच्या बाजारात विकल्याची कबुली दिली. तसेच या चोरीत सहभागी असलेल्या इतर साथीदारांची नावेही पोलिसांना सांगितली.
५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या शेळ्यांची विक्री करून मिळालेली रोख रक्कम आणि चोरीसाठी वापरलेली वाहने हस्तगत केली:
-
०१ महिंद्रा पिकअप वाहन
-
०२ मोबाईल हॅण्डसेट
-
शेळ्या विकून आलेली रोख रक्कम
-
एकूण जप्त मुद्देमाल : ₹५,२५,०००/-
पवनचक्की वायर चोरीच्या १४ गुन्ह्यांत पाहिजे असलेला आरोपी जेरबंद
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव रमेश विश्वनाथ काळे (वय ३२ वर्षे, रा. पारधी पिढी, भूम, जि. धाराशिव) असे आहे. पोलीस तपासात निष्पन्न झाले की, हा आरोपी धाराशिव जिल्ह्यातील विविध भागांतील पवनचक्कींच्या तारा (केबल) चोरीच्या तब्बल १४ गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला (मोस्ट वॉन्टेड) आरोपी आहे. त्याच्या अटकेमुळे पवनचक्की केबल चोरीच्या प्रकरणांच्या तपासाला मोठा वेग मिळणार आहे. या कारवाईत त्याच्यासोबत असलेल्या एका विधीसंघर्षग्रस्त बालकासही ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपीची वैद्यकीय तपासणी पूर्ण करून त्याला कायदेशीर अहवालासह पुढील कारवाईसाठी भूम पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
सदरची उल्लेखनीय कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण आणि चालक पोलीस हवालदार नागनाथ गुरव यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.





