उमरगा : बसस्थानकावरील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने तरुणीच्या पर्सची चेन उघडून त्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुंजोटी (ता. उमरगा, जि. धाराशिव) येथील रहिवासी अब्दुल लतीफ अब्दुल करीम शेख (वय ६० वर्षे) यांच्या मुलीकडे असलेली पर्स चोरट्यांनी लक्ष्य केली. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास उमरगा बसस्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी असताना, अज्ञात भामट्याने तिच्या पर्सची चेन अत्यंत शिताफीने उघडली आणि त्यातील ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (पोलीस तक्रारीत नमूद किंमत ४३ हजार ७५० रुपये) लंपास केले.
चोरीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर अब्दुल लतीफ शेख यांनी १२ नोव्हेंबर रोजी उमरगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून उमरगा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) (चोरी करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उमरगा पोलीस या चोरट्याचा शोध घेत आहेत.


