धाराशिव : जिल्ह्यात ग्रामीण भागातील शेती उपयोगी साहित्याच्या चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, परंडा आणि उमरगा तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांत अज्ञात चोरट्यांनी एकूण ७२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी परंडा आणि उमरगा पोलीस ठाण्यात चोरीचे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कपिलापुरी येथे पोल्ट्रीशेडसाठी आणलेले ३८ हजारांचे तारेचे बंडल लंपास
परंडा तालुक्यातील कपिलापुरी येथील मूळ रहिवासी व सध्या तुपे वस्ती, मोशी (ता. हवेली, जि. पुणे) येथे वास्तव्यास असलेल्या अंकीता धर्मराज पाटील (वय २६ वर्षे) यांच्या कपिलापुरी शिवारातील शेत गट क्रमांक ६५ मध्ये पोल्ट्रीशेडचे काम सुरू आहे. या पोल्ट्रीशेडला कंपाऊंड उभारण्यासाठी त्यांनी लोखंडी तारेचे बंडल आणून ठेवले होते. मात्र, अज्ञात चोरट्यांनी संधी साधत लोखंडी तारेचे ८ बंडल (अंदाजे किंमत ३८ हजार रुपये) चोरून नेले. याप्रकरणी अंकीता पाटील यांनी १३ नोव्हेंबर रोजी परंडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कदेर शिवारातील शेतातून बोअरची ८५० फूट केबल चोरीला
दुसऱ्या घटनेत, उमरगा तालुक्यातील कदेर येथील रहिवासी शिवलिंगप्पा गुंडाप्पा दुर्गे (वय ५३ वर्षे) यांच्या कदेर शिवारातील ५७ क्रमांकाच्या शेतातील बोअरवेलची केबल चोरट्यांनी लांबवली आहे. अज्ञात चोरट्यांनी शेतातील बोअरची सुमारे ८५० फूट लांबीची केबल वायर (अंदाजे किंमत ३४ हजार ४०० रुपये) कापून चोरून नेली. चोरीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवलिंगप्पा दुर्गे यांनी १३ नोव्हेंबर रोजी उमरगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्य आणि केबल चोरीच्या घटना वाढल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, परंडा व उमरगा पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.




