वाशी – ट्रॅक्टर खरेदीचा व्यवहार करून अवघे १५०० रुपये फोन पे द्वारे पाठवून उर्वरित रकमेपोटी खात्यावर शिल्लक नसलेला ६ लाख रुपयांचा एचडीएफसी बँकेचा चेक देऊन एका २१ वर्षीय तरुणाची ५ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ट्रॅक्टर नेल्यानंतर उर्वरित रकमेचा तगादा लावला असता ट्रॅक्टर पेटवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
जानकापूर (ता. वाशी, जि. धाराशिव) येथील रहिवासी निरंजन नामदेव थोरात (वय २१ वर्षे) यांच्याकडे ट्रॅक्टर विक्रीसाठी उपलब्ध होता. १५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी निरंजन थोरात यांच्या जानकापूर येथील घरी आले. त्यांनी ५ लाख ३५ हजार रुपयांमध्ये ट्रॅक्टर खरेदीचा व्यवहार ठरवला.
त्यानंतर आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला केवळ १,५०० रुपये फोन पे (PhonePe) द्वारे पाठवले. उर्वरित रकमेसाठी त्यांनी एचडीएफसी (HDFC) बँकेचा ६ लाख रुपयांचा चेक फिर्यादीच्या हातात दिला आणि ट्रॅक्टर ताब्यात घेऊन निघून गेले. मात्र, फिर्यादीने सदर चेक बँकेत वटवण्यासाठी टाकला असता आरोपींच्या खात्यात कोणतीही रक्कम शिल्लक नसल्याने तो चेक बाऊन्स झाला.
पैसे मागितल्यावर ट्रॅक्टर पेटवून देण्याची धमकी
खात्यात पैसे नसताना बनावट व खोटा चेक देऊन आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निरंजन थोरात यांनी आरोपींशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी आपले ठरलेले पैसे देण्याची किंवा ट्रॅक्टर परत करण्याची मागणी केली. त्यावर आरोपींनी पैसे देण्यास नकार देत “पुन्हा फोन केला किंवा पैशांचा तगादा लावला तर ट्रॅक्टर पेटवून देऊ,” अशी उघड धमकी दिली.
वाशी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा नोंद
आर्थिक फसवणूक व धमकीच्या या प्रकारानंतर निरंजन थोरात यांनी १३ ऑक्टोबर २०२६ रोजी वाशी पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:
-
आरोपी :
१) सोहेल शौकत शेख
२) विरेन राठोड
३) समीर अरब (तिघे रा. अंथुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे)
४) बबलु वाघमोडे (रा. शेळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे)
-
दाखल कलमे : भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) (फसवणूक), ३५१(२) (धमकी देणे) आणि ३(५) (समान हेतू).
शेतकऱ्यांची व वाहनधारकांची दिशाभूल करून अशा प्रकारे वाहने पळवणाऱ्या टोळीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.






