चिवरी (तुळजापूर) : कोणत्याही वैद्यकीय पदवी व परवान्याशिवाय पत्र्याच्या शेडमध्ये दवाखाना थाटून नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांचा नळदुर्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. काटगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईनंतर या दोघांविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात फसवणूक आणि महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील रहिवासी असलेले दीपंकर मोटो मंडल आणि सुशांत बिरेन मंडल (दोघे रा. जलकर, भोमस पश्चिमपारा, जि. नादिया, प. बंगाल; सध्या रा. चिवरी, ता. तुळजापूर) हे दोघे तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील हनुमान मंदिराजवळ असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररीत्या वैद्यकीय व्यवसाय चालवत होते.
कोणताही अधिकृत परवाना किंवा वैद्यकीय पदवी नसताना हे दोघे स्वतः अधिकृत डॉक्टर असल्याचे भासवत होते. त्या ठिकाणी बीपी ऑपरेटर, डिजिटल थर्मामीटर, स्टेथोस्कोप, ॲलोपॅथिक गोळ्या, कॅप्सूल्स, इंजेक्शन्स, आयव्ही फ्लुईड्स, जेल, कॉटन आणि विविध प्रकारची लोशन्स असा साठा बाळगून ते रुग्णांवर उपचार करत होते. यामुळे रुग्णांच्या जिवाला गंभीर धोका निर्माण झाला होता.
याबाबत माहिती मिळताच काटगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साईनाथ संगमेश्वर जळकोट (वय ३४) यांनी ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता चिवरी येथे जाऊन पाहणी केली असता हा बोगस वैद्यकीय कारभार उघडकीस आला.
त्यानंतर डॉ. जळकोट यांनी ८ नोव्हेंबर रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी दीपंकर मंडल आणि सुशांत मंडल या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) (फसवणूक), ३१९ (तोतयागिरी करून फसवणूक), १२५ (जिवाला धोका निर्माण करणे) सह महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी अधिनियम कलम ३३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस पुढील तपास करत आहेत.





