धाराशिव : दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम उघडली असून महामार्गावर सापळा रचून तब्बल १२८.३८ किलो गांजा आणि आयशर वाहन असा एकूण ८० लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोघांना जागेवरच अटक करण्यात आली असून यामध्ये आंतरराज्य टोळी सक्रिय असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेची (LCB) दोन पथके तुळजापूर-नळदुर्ग-उमरगा महामार्गावर गस्त घालत होती. या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांना एक आयशर वाहन भरधाव वेगात संशयास्पदरीत्या नळदुर्गच्या दिशेने जाताना दिसले. पोलिसांनी इशारा देऊनही चालकाने गाडी न थांबवता पळवून नेली. त्यामुळे संशय बळावल्याने कासार यांनी पुढे गस्तीवर असलेले पोलीस हवालदार दयानंद गाडेकर यांना सतर्क केले.

हवालदार गाडेकर यांनी तत्परता दाखवत जळकोट येथील निरंजन हॉटेलच्या पुढे सदर आयशर वाहन अडवले. चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. वाहनाची तपासणी केली असता आत गांजासदृश मुद्देमाल दिसून आला. पोलिसांनी तात्काळ शासकीय पंच, फॉरेन्सिक व्हॅन आणि वजन तज्ज्ञांना घटनास्थळी बोलावून घेतले. फॉरेन्सिक तपासणीत तो गांजा असल्याचे निष्पन्न झाले.
वाहनातून व्यावसायिक प्रमाणातील (Commercial Quantity) एकूण १२८.३८ किलोग्रॅम गांजा आणि आयशर वाहन असा एकूण ८० लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी वाहनचालक आकाश दांगट आणि त्याचा सहकारी महादेव जाधव या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार दयानंद गाडेकर यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५५९/२०२६ अन्वये एनडीपीएस (NDPS) कायद्याच्या कलम ८ (क), २० (ब)(ii)(क), २५ आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार दयानंद गाडेकर, फरहान पठाण, चालक पो.ह. सुभाष चौरे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल अशोक ढगारे आणि चालक पोलीस शिपाई बाबा गुरव यांनी पार पाडली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार करत आहेत.





