लोहटा पूर्व (कळंब) : लग्नाचे आमिष दाखवून नंतर लग्नास नकार देत फोनवर अपमानकारक संभाषण केल्याने एका १९ वर्षीय तरुणीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील एका तरुणासह त्याच्या चुलती आणि बहिणीविरुद्ध शिराढोण पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोहटा पूर्व (ता. कळंब) येथील रहिवासी निशा बाबासाहेब भिसे (वय १९ वर्षे) हिला संशयित आरोपी शिवचरण दिगंबर भारती (वय २५ वर्षे, रा. दिग्रस, ता. कंधार, जि. नांदेड) याने लग्नाचे आमिष दाखवले होते. मात्र, त्यानंतर त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला. याशिवाय शिवचरण, त्याची चुलती अश्विनी भारती आणि बहीण कौशल्या यांनी निशाला फोनवरून अत्यंत हीन वागणूक देत अपमानकारक बोलून तिचा मानसिक छळ केला.
या सततच्या त्रासाला आणि अपमानाला कंटाळून निशा हिने २० ऑक्टोबर रोजी सकाळी ८:४५ वाजेच्या सुमारास लोहटा पूर्व येथील घरी विषारी औषध प्राशन केले. प्रकृती गंभीर झाल्याने तिला तात्काळ उपचारासाठी लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात (स.द. लातूर) दाखल करण्यात आले होते. मात्र, तब्बल २० दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:४५ वाजता उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याप्रकरणी मयत तरुणीची आई मीरा बाबासाहेब भिसे (वय ३९ वर्षे, रा. लोहटा पूर्व) यांनी ९ नोव्हेंबर रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. मीरा भिसे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मुख्य आरोपी शिवचरण भारती, त्याची चुलती अश्विनी भारती आणि बहीण कौशल्या (सर्व रा. दिग्रस, ता. कंधार, जि. नांदेड) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ३५१ (गुन्हेगारी धमकी) आणि ३(५) (समान उद्देशाने एकत्रित गुन्हा करणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिराढोण पोलीस करत आहेत.





